-तर आम्हीच नाही का पालकमंत्री झालो असतो?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:14 PM2018-12-17T23:14:16+5:302018-12-17T23:15:04+5:30
लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केले. त्याचा वचपा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी आमच्यावर जादुटोणा करण्यासाठीचे गुन्हे दाखल करविले. जादुटोणा खरा असता आणि आम्हाला तो करता आला असता तर आम्हीच नाही का पालकमंत्री झालो असतो, असा सवाल गुन्हे दाखल झालेल्या 'त्या' पाच महिलांनी आज पत्रपरिषदेत उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केले. त्याचा वचपा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी आमच्यावर जादुटोणा करण्यासाठीचे गुन्हे दाखल करविले. जादुटोणा खरा असता आणि आम्हाला तो करता आला असता तर आम्हीच नाही का पालकमंत्री झालो असतो, असा सवाल गुन्हे दाखल झालेल्या 'त्या' पाच महिलांनी आज पत्रपरिषदेत उपस्थित केला.
स्थानिक कल्याणनगर चौक ते दस्तुरनगर रस्त्याच्या श्रेयवादावारून पेटलेल्या भांडणातून पालकमंत्र्यांच्या घरासमोर चोळीबांगडी आणि बेशरमच्या झाडाचा अहेर ठेवण्याचे आंदोलन बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्या समर्थक महिलांनी केले होते. सदर महिलांवर आंदोलनासाठीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी त्याच महिलांवर अचानक जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गतदेखील गुन्हे नोंदविण्यात आले. विशेष असे की त्या गुन्ह्यांसाठीची तक्रार पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे स्वीय सहायक अमोल काळे यांनी दिली.
हा तर स्त्रियांचा अपमान!
शासन जादुटोण्याविरुद्ध कायदा अंमलात आणते आणि भाजपचे आमच्या जिल्ह्यातील पालकमंत्री जादुटोण्यावर विश्वास ठेवतात, किती हा बालिशपणा. अशा व्यक्तीच्या हाती जिल्ह्याचे पालकत्त्व असावे, किती हे लाजिरवाणे, किती हे चिंताजनक, असे बोचरे सवाल त्यांनी उपस्थित केले. पालकमंत्र्यांनी स्त्रियांचा सन्मान करावा, खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेशरमच्या झाडाप्रमाणे वागणाºया पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याविरुद्ध आम्हीही पोलिस तक्रार करू, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष व मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करू, असा इशारा त्या महिलांनी दिला. यावेळी संगीता काळपांडे, वंदना जामनेकर, मीरा कोलटेके, चंदा लांडे, कोमल मानापुरे या उपस्थित होत्या.
१० कोटींचा मानहानी दावाही ठोकणार
लोकशाही पद्धतीने समस्या मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांविरुद्ध धादांत खोटी तक्रार देण्यासाठी पदाचा दुरुपयोग करणे, पोलिस यंत्रणेचा गैरवापर करणे, महिलांचा अपमान करणे, यासाठी पालकमंत्र्यांवर गुन्हे न नोंदविल्यास १० कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल करू, असा इशारा 'त्या' महिलांनी दिला.