निरोपही नाही... पावले जड झाली..
By admin | Published: November 25, 2015 12:39 AM2015-11-25T00:39:11+5:302015-11-25T00:39:11+5:30
ज्या बॅँकेची प्रगती अनुभवली त्याच बॅँकेची अधोगतीही अनुभवावी लागली.
अमरावती : ज्या बॅँकेची प्रगती अनुभवली त्याच बॅँकेची अधोगतीही अनुभवावी लागली. जीवनभर जेथे सेवा दिली तेथून बाहेर पडताना शेवटच्या दिवशी हक्काचा निरोपही मिळू शकला नाही. नोकरी गेली... आयुष्याचा आधार हरवला...अशा अवस्थेत जड अंत:करणाने आणि रिक्तहस्ते बँकेतून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे डोळे ओलावले होते. काहींनी तर ढसाढसा रडून त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
हतबल झाले कर्मचारी
अमरावती : भूविकास बँकेच्या ३९ अधिकारी कर्मचाऱ्यांना मंगळवारी बँकेतून कायमचे बेदखल करण्यात आले. नोटीस मिळाल्यानंतर उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे, यावर अनेक कर्मचाऱ्यांचा विश्वासच बसला नाही. आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशा टोकाच्या भावना काही हतबल कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्यात. नैसर्गिक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील ज्येष्ठ कर्मचारी या आकस्मिक आघाताने अधिकच विमनस्क झाल्याचे चित्र होते. नुकसान भरपाई आणि थकीत वेतनासाठी शासनाकडे १४.७५ कोटीही नाहीत काय?, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
मंगळवारी सायकांळी ६ वाजता बॅँकेतील कर्मचाऱ्यांनी जड अंत:करणाने एकमेकांची समजूत काढीत शेवटचा निरोप दिला. नोकरी गमावल्याची नोटीस मिळाली पण पुढे पैशासाठी चकरा माराव्या लागतील, या त्यांच्या शब्दातून भविष्याबद्दल लागून राहिलेली भीती व्यक्त होत होती. शुक्रवार २० नोव्हेंबरलाच ‘सेवामुक्तीची’ चाहूल या कर्मचाऱ्यांना लागली होती. मात्र, तेव्हा कसेबसे टळलेले मरण मंगळवारी, २४ नोव्हेंबरला त्यांच्या वाट्याला आलेच. सायंकाळी बॅँकेच्या सेवेतून कायद्याने कमी झालेल्या या कर्मचाऱ्यांना कुणीही अधिकृत निरोप दिला नाही. परस्परांबद्दल जिव्हाळा व्यक्त करीत या कर्मचाऱ्यांनी एकमेकांना आधार देत बँकेच्या परिसराला अलविदा केले.
दीड वर्षांपूर्वी माझ्या पतीने आर्थिक अडचणीमुळे स्वत:ला संपवून घेतले. आज वारसा हक्काने भविष्यासाठी रक्कम तरी मिळेल, अशी आशा होती. मात्र, हाती फक्त नोटिसच आली, मुलांचा सांभाळ कसा करायचा?
- वनिता राजेंद्र काळबांडे,
मृत कर्मचाऱ्याची पत्नी
आता आम्ही अन् लेकराबाळांनी फाशी घ्यायची का? सेवामुक्त करायचे होते तर हिशेब चुकता करायचा होता. अवसायक दबावात आहेत.
- विलास देशमुख,
कर्मचारी भूविकास बॅँक