‘अड्डा २७’सह पाच पार्लरला नोंदणी रद्दची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 12:05 AM2017-05-17T00:05:12+5:302017-05-17T00:05:12+5:30
शहराच्या सभ्य संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या हुक्का - २७ सह पाच पार्लर्सना नोंदणी रद्द करण्याची नोटीस बजावण्यात आली.
सहायक कामगार आयुक्तांची कारवाई : पोलीस आयुक्तांना देणार तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराच्या सभ्य संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या हुक्का - २७ सह पाच पार्लर्सना नोंदणी रद्द करण्याची नोटीस बजावण्यात आली. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने मंगळवारी ही कारवाई केली. ‘लोकमत’ने यासंबंधाने आवाज बुलंद केल्याने ही कारवाई होऊ शकली.
शहरातील बसस्थानक मार्गावरील अड्डा २७, बडनेरा रोडस्थित गोपालनगरातील मधुरम, तपोवन मार्गावरील कस्बा हुक्का बार, एमआयडीसी रोडवरील बगिया गार्डनस्थित वायफाय कॅफे आणि राठी नगरातील फुड इन या पाच पार्लरची नोंदणी रद्दची नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील या पार्लरच्या संचालकांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत विविध व्यवसायाची नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले होते. मात्र, नोंदणीकृत व्यवसायाआड दुसराच व्यवसाय सुरू ठेवल्याचे दुकान निरीक्षकांच्या निदर्शनास आले.
अड्डा-२७ सह या सहाही पार्लर्समध्ये हुक्का पार्लर चालवून डॉन्स पार्लरचा व्यवसाय फोफावत असल्याचा आरोप बजरंग दलानेही केला होता.
अवैध व्यवसाय करणाऱ्या या हुक्का पार्लरच्या संचालकांनी शासनाची दिशाभूल करीत फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी तक्रार सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने पोलिसांकडे करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली होती.
या आंदोलनाची दखल घेत सहायक कामगार आयुक्तांमार्फत पोलिसांना पत्र पाठवून तक्रारसुध्दा करण्यात येणार आहे.
मंगळवारी दुकाने निरीक्षक संजय दिघडे व अपर्णा कांबळे यांनी शहरातील सहाही हुक्का पार्लरचे "स्पॉट इन्स्पेक्शन" केले. स्थळ पाहणीच्या अहवालावरून सहायक कामगार आयुक्तांमार्फत अड्डा २७ सह पाच पार्लरला नोंदणी रद्दच्या नोटीशी बजाविण्यात आल्या आहेत.
सीपींना आज पाठविणार पत्र
अड्डा २७ सह पाच पार्लर्सच्या संचालकांनी नोंदणीकृत व्यवसायाआड दुसरेचे व्यवसाय सुरू ठेवले. हा प्रकार शासनाची दिशाभूल व फसवणूक करणारा आहे. या गैरप्रकारासंबंधित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी सहायक कामगार आयुक्तांमार्फत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली जाणार आहे. बुधवारी सहायक कामगार आयुक्त आर.बी.आडे यांच्या हस्ताक्षराने ती तक्रार पोलीस विभागाला सोपविली जाणार आहे.
आधी व्यवसाय नंतर नोंदणी
अंबादेवी रोडवरील तिरुपती टॉवरस्थित हॉटस्पोर्ट कॅफेचा व्यवसाय सुरू होता. हॉटस्पोर्टच्या संचालकांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयातून शॉपअॅक्टची नोंदणी न करताच व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. सद्यस्थितीत त्यांनी नोंदणी करण्यासंदर्भात अर्ज सादर केला असून तो अर्जसुध्दा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हुक्का पार्लर नोंदणीला "फिल्टर"
आॅनलाईन नोंदणी प्रक्रियेत हुक्का पार्लर या व्यवसायाची नोंदणी होऊ नये, यासाठी नोंदणी प्रक्रियेत फिल्टर लावण्यात यावे, जेणे करून हुक्का पार्लरची नोंदणी होताना अॅटोमॅटिक या व्यवसायाची नोंदणी संगणक करणार नाही. याबाबत काळजी घेण्यासाठी आॅनलाईन प्रक्रियेत बदल करून फिल्टर लावण्यात यावे, असा प्रस्ताव सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत कामगार आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक कामगार आयुक्त आर.बी. आडे यांनी "लोकतम"शी बोलताना दिली.
हुक्का पार्लरच्या कारवाईवरून मारहाण
शहरातील हुक्का पार्लरवरील झालेल्या कारवाईच्या कारणास्तव दीपक शोभराज भोजवाणी यांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हुक्का पार्लरच्या मुद्यावरून बदनामी केल्याच्या कारणावरून राहुल रामचंद मेठानी, रामचंद चंदुमल मेठानी, थांबर चंदुमल मेठानी, दिपक मेठानी, सूरज मेठानी (सर्व रा.रामपुरी कॅम्प) व त्यांचे अन्य साथीदारांनी हा हल्ला केल्याचा आरोप दीपक भोजवाणी याने पोलीस आयुक्तांकडे तक्रारीतून केला आहे. १२ मे रोजी रात्री ८.३० वाजता दीपक भोजवानी हा सोनू किराणाजवळ उभा असताना हा सामूहिक हल्ला करण्यात आला. स्थानिक रहिवाशांनी मध्यस्ती केल्यामुळे दीपक यांचा जीव वाचल्याचे निवेदनात नमुद आहे. यात दीपक भोजवानीच्या डोके व पाठीवर गंभीर दुखापत झाली. दीपक भोजवानीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपीविरुद्ध भादंविच्या ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे भोजवानीने सीपींना दिलेल्या तक्रारीत केले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे हल्लेखोर पुन्हा प्राणघातक करू शकतात, त्यामुळे पोलीस सरंक्षण द्यावे, अशी मागणी दीपक भोजवानीने केली आहे.
दुकाने निरीक्षकांमार्फत पाच पार्लर्सना नोंदणी रद्दची नोटीस बजावण्यात आली आहे. अड्डा २७ सह पाचही पार्लर्सच्या संचालकांनी नोंदणीकृत व्यवसाय न करता दुसरेच व्यवसाय सुरू करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा तक्रारीचे पत्र पोलिसांना पाठविले जाईल.
- डी.बी.जाधव, सरकारी कामगार अधिकारी