चाफेकर अॅण्ड कंपनीला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2016 12:17 AM2016-06-15T00:17:48+5:302016-06-15T00:17:48+5:30
अटी-शर्ती डावलून मनमानी काम करणाऱ्या ‘चाफेकर अॅन्ड कंपनी’ला शहर अभियंत्यांकडून नोटीस पाठविण्यात आली आहे.
राजापेठ उड्डाण पूल : महापौरांच्या पाहणीनंतर यंत्रणेला जाग
अमरावती : अटी-शर्ती डावलून मनमानी काम करणाऱ्या ‘चाफेकर अॅन्ड कंपनी’ला शहर अभियंत्यांकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. महापौरांनी राजापेठ उड्डाण पुलाच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर यंत्रणेला जाग आली आहे. त्यानंतर सर्व्हिस रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांकडून या कंपनीला देण्यात आल्या आहेत.
बहुप्रतीक्षित राजापेठ उड्डाण पुलाचे बांधकाम ‘चाफेकर अॅन्ड कंपनी’कडून होत आहे. बांधकाम प्रगतिपथावर असल्याने सर्व वाहतूक बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडने सुरु आहे. परंतु या पर्यायी रस्त्यांवर अनेक खड्डे पडून आहेत. तसेच डांबरीकरण नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महापौर रिना नंदा यासुद्धा रोज याच मार्गाने ये-जा करतात. राजापेठ उड्डाण पुलालगतच्या या मार्गाची दुरवस्था त्यांच्याही लक्षात आली. १० जून रोजी महापौरांनी या दुरवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत शहर अभियंता जीवन सदारसह अन्य अभियंत्यांना राजोपठ उड्डाण पुलाच्या सर्व्हिस रोडवर बोलावून घेतले व चाफेकर कंत्राटदाराच्या कामाबद्दल तीव्र रोष व्यक्त केला. ‘चाफेकर अॅन्ड कंपनी’नेच याठिकाणी ठरल्याप्रमाणे पट्टे मारायचे होते. ‘नो पार्किंग’ झोन घोषित करुन वाहने सर्व्हिस रोडवर उभे राहणार नाहीत, याची खबरदारी कंत्राटदाराने घ्यायला हवी होती. त्यामुळे सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे बुजवून कंत्राटदाराने त्वरित डांबरीकरण करावे, अशा सूचना महापौरांनी शहर अभियंत्यांना केल्या आहेत.