आदिवासी ‘व्हॅलिडीटी’त बोगसगिरी थांबेना, टकारीचे केले टाकणकार; अमरावतीच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने बजावली नोटीस
By गणेश वासनिक | Published: December 17, 2023 04:33 PM2023-12-17T16:33:33+5:302023-12-17T16:33:52+5:30
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी विलास पुंडलिकराव गुल्हाणे यांच्या तक्रारीनुसार बुधासिंग बालचंदम झाकर्डे यांचे १४ जुलै २०१२ रोजी मृत्यू झाला आहे.
अमरावती : राज्यात आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण मिळण्यासाठी रस्सीखेच सुरु असताना बनावट कागदपत्राच्या आधारे ‘टकारी’चे ‘टाकणकार’ करून ‘व्हॅलिडीटी’ मिळविल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी अमरावती येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने रामेश्र्वर बुधासिंग झाकर्डे यांना नोटीस बजावून मूळ प्रत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी विलास पुंडलिकराव गुल्हाणे यांच्या तक्रारीनुसार बुधासिंग बालचंदम झाकर्डे यांचे १४ जुलै २०१२ रोजी मृत्यू झाला आहे.
बुधासिंग झाकर्डे यांनी अमरावती येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त केलेले एमआरसी ८१ जामगाव/३१९/ २०१०-११ अन्वये ६ सप्टेंबर २०१० रोजीचे ‘टाकोणकार’ या अनुसूचित जामतीच्या जात प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करण्यासाठी तक्रारीसह आवश्यक कागदपत्रे जोडली आहेत. ही कागदपत्रे ‘व्हॅलिडीटी’ समितीने पोलिस दक्षता पथकाकडे चौकशीकरिता पाठविली होती. यात चौकशी अहवाल बुधासिंग झाकर्डे यांच्या प्रकरणात जातीच्या नोंदी सन १९३२, १९३६, १९३९, १९४० आणि १९५८ या ‘टकारी’ प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे बुधासिंग यांचे वारसदार असलेले रामेश्र्वर झाकर्डे यांना चौकशीअंती ‘टकारी’ नोंदी आढळून आल्याने अनावधाने जारी करण्यात आलेले ‘टाकणकार’जमातीचे वैधता प्रमाणपत्राची मूळ प्रत जमा करावी, असे निर्देश १३ ऑक्टोबर २०२३ रोजी अमरावती येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीच्या उपसंचालकांनी नोटीशीद्वारे दिले आहेत.
तक्रारीच्या अनुषंगाने रामेश्वर झाकर्डे यांच्या प्रकरणी पोलिस दक्षता पथकाच्या अहवालानुसार ‘टाकणकार’ जमातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द का करण्यात येवू नये अशी नोटीस बजावली आहे. तसेच हे प्रमाणपत्र कार्यालयात सेवा शाखेकडे जमा करण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यांनी दिशाभूल व फसवणूक केल्याचे स्पष्ट होते. - शिवानंद पेढेकर, उपसंचालक तथा सदस्य सचिव(प्रभारी) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती, अमरावती.