दीपाली यांना गर्भपातानंतरही मेडिकल बोर्डासाठी बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:02+5:302021-04-09T04:14:02+5:30
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांचा गर्भपात झाला होता. त्यामुळे २ ते १५ जानेवारी २०२१ दरम्यान ...
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांचा गर्भपात झाला होता. त्यामुळे २ ते १५ जानेवारी २०२१ दरम्यान त्या वैद्यकीय रजेवर होत्या. मात्र, निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने दीपाली यांचे मेडिकल बिल नांमजूर केले आणि यवतमाळ येथील शासकीय मेडिकल बोर्डाकडे तिला तपासणीसाठी नोटीस बजावली होती, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारतीय वन सेवेतील (आयएफएस) अधिकारी कशाप्रकारे अन्याय, अत्याचार करतात, हे दीपाली यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर उघडकीस आले आहे. दीपाली यांनी २५ मार्च रोजी गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी धारणी पोलिसांत आरोपी शिवकुमार याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याचे निलंबन करण्यात आले. दीपाली यांचा गर्भपात झाल्याने त्या २ ते १५ जानेवारी दरम्यान मेडिकल रजेवर होत्या. विनोद शिवकुमार याच्या आदेशानुसार दीपाली या २५ जानेवारी रोजी रुजू झाल्यात. परंतु, रुजू होताना दीपाली यांनी मेडिकल रजेबाबतचे कागदपत्रे विनाेद शिवकुमार याला सादर केले असताना त्याने ही कागदपत्रे फेटाळत तपासणीसाठी यवतमाळ येथील शासकीय मेडिकल बोर्डाकडे जाण्यासाठी नोटीस बजावली. गर्भपात झाल्याने यवतमाळ येथे जाणे शक्य नव्हते. तरीदेखील विनोद शिवकुमार याने वैद्यकीय रजेचे देयके अदा केली नाही. दीपाली यांच्या मृत्यूनंतरही आजपर्यंत व्याघ्र प्रकल्पाने वैद्यकीय रजेचे बिल दिले नाही, अशी माहिती आहे.
-----------------
विनोद शिवकुमार याने दीपाली यांना रुजू होण्यास सांगितले होते. त्यानुसार गर्भपात झाल्यानंतरही कर्तव्याला प्राधान्य देत ती रुजू झाली. मात्र, मेडिकल बिले नाकारले आणि यवतमाळ येथील मेडिकल बोर्डाकडे जाण्यासाठी नोटीस बजावली होती. मेडिकल बिल नाकारून आर्थिक कोंडी केली.
- राजेश माेहिते, (दीपाली यांचे पती)