वाळू उपसा प्रकरणात पोकलेन चालक-मालकाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 05:00 AM2021-10-29T05:00:00+5:302021-10-29T05:01:00+5:30
चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे व तळेगाव दशासरचे ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहितीवरून चांदूर रेल्वे तालुक्यातील झिबला येथील बेंबळा नदी धरणावर छापा टाकला असता, अवैध वाळू उपसा मिळून आला. घटनास्थळावरून दोन लाख रुपयांचे अंदाजे ५० ब्रास वाळू व ४० लाख रुपये किमतीचे पोकलेन असा एकूण ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : चांदूर रेल्वे तालुक्यातील येरडजवळ असलेल्या झिबला शिवारात बेंबळा नदी धरणावर अवैध वाळू उपसा करताना चांदूर रेल्वेच्या महसूल विभाग व तळेगाव दशासर पोलिसांनी २२ ऑक्टोबर रोजी संयुक्तरीत्या छापा टाकून एकूण ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणात पोकलेन चालक-मालकाला नोटीस बजावल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली असून, त्यानंतर कारवाई होणार असल्याचे समजते. पोलिसात या प्रकरणात तक्रार देण्यात आलेली नाही.
चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे व तळेगाव दशासरचे ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहितीवरून चांदूर रेल्वे तालुक्यातील झिबला येथील बेंबळा नदी धरणावर छापा टाकला असता, अवैध वाळू उपसा मिळून आला. घटनास्थळावरून दोन लाख रुपयांचे अंदाजे ५० ब्रास वाळू व ४० लाख रुपये किमतीचे पोकलेन असा एकूण ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोकलेन चालक वीजेंद्र बुद्धसेन कुमार (२८, रा. छाचई, जि. शहडोल, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात होते. या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून हा उपसा सुरू होता. अखेर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. परंतु, हा उपसा करणारा खरा सूत्रधार कोण, याचा सुगावा अद्याप यंत्रणेला लागलेला नाही.
तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी जप्त पोकलेनचे मालक व चालक यांना नोटीस बजावली असून, त्यांच्या खुलाशानंतर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोकलेन मालक तारीकभाई लोखंडवाला (रा. यवतमाळ) व पोकलेन चालक वीजेंद्र कुमार (रा. छाचई, मध्य प्रदेश) या दोघांना या प्रकरणात नोटीस बजावली आहे. त्यांच्या खुलाशानंतर पुढील कारवाईची प्रक्रिया करण्यात येईल.
- राजेंद्र इंगळे, तहसीलदार, चांदूर रेल्वेचे
या प्रकरणात महसूल विभागाकडून कुठलीही तक्रार देण्यात आली नाही. तक्रार आल्यास एफआयआर दाखल करू.
- अजय आकरे
ठाणेदार, तळेगाव दशासर