अमरावती शहरात खासगी डॉक्टरांना बजावल्या नोटिशी
By admin | Published: April 3, 2015 11:54 PM2015-04-03T23:54:04+5:302015-04-03T23:54:04+5:30
महापालिका हद्दीत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या खासगी डॉक्टरांनी निवासी वापरात बदल केल्याप्रकरणी ४० टक्के
एसडीओची कारवाई : निवासी वापरात बदल करण्याचे कारण
अमरावती : महापालिका हद्दीत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या खासगी डॉक्टरांनी निवासी वापरात बदल केल्याप्रकरणी ४० टक्के दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोटिसी बजावल्या आहेत. सात दिवसांच्या आत ही रक्कम शासन तिजोरीत जमा करण्यात आली नाही तर हॉस्पिटलला टाळे लावले जाईल, असे महसूल विभागाने कळविले आहे. मात्र, ही बाब नियम विसंगत असल्याचे कारण पुढे करुन शुक्रवारी इंडियन मेडिकल असोशियनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांची भेट घेऊन शहरातील खासगी डॉक्टरांनी कैफियत मांडली.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांना दिलेल्या निवेदनात असोशिएशनचे अध्यक्ष वसंत लवणकर, चंद्रशेखर कुळकर्णी यांनी शासन निर्णय क्र. जमीन २४९९/ प्र. क्र.१२५/ज-८ मंत्रालय, मुंबई दि.२८/१२/२०११ च्या निर्णयानुसार महापालिका हद्दीतील डॉक्टरांनी विनापरवानगीने निवासी वापरात बदल केल्याने एकतर्फी कारवाईचा निर्णय घेतला आहे. अवाजवी दंडाची आकारणी करुन ती सात दिवसाांत शासनकडे जमा करण्याबाबत कळविले आहे. याला अनुसरुन काही डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई केल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष वसंत लवणकर यांनी केला आहे. शासन निर्णयानुसार महापालिकेतून डॉक्टरांनी बांधकाम परवानगी ही निवासी घेतली होती. कालांतराने या निवासस्थानी वैद्यकीय व्यवसाय सुरु केला आहे.
निवासी वापरात बदल करण्याची कारवाई ही डॉक्टरांवर लागू होत नाही. त्यामुळे विनापरवागीने वापरात बदल केल्याप्रकरणी ४० टक्के दंडात्मक रक्कम वसूल करणे संयुक्तिक नाही. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने प्रकाशित केलेल्या न्यायसंगत बाबीत हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कारवाई थांबविली नाही तर डॉक्टर रस्त्यावर येतील.
- वसंत लवणकर,
अध्यक्ष, आय.एम.ए
वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या खासगी डॉक्टरांना शासन नियमानुसारच नोटीस बजावल्या आहेत. एसडीओ म्हणून शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे कर्तव्य आहे. निवासी वापरात बदल केल्याप्रकरणी ही कारवाई आहे. महसूल वाढीसाठीचे हे प्रयत्न असून शासन निर्णयानुसारच खासगी डॉक्टरांना नोटीस दिल्या आहेत.
-प्रवीण ठाकरे,
उपविभागीय अधिकारी, अमरावती.