लघुशंकेचा बहाणा; कुख्यात गजाननचा पोलिसांना चकमा, कारागृहाबाहेरून पळाला

By प्रदीप भाकरे | Published: August 14, 2022 10:07 PM2022-08-14T22:07:52+5:302022-08-14T22:08:04+5:30

फ्रेजरपुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आरोपीने लघुशंकेचा बहाणा केल्याचे म्हटले आहे.

Notorious Gajanan eludes police, escapes from prison | लघुशंकेचा बहाणा; कुख्यात गजाननचा पोलिसांना चकमा, कारागृहाबाहेरून पळाला

लघुशंकेचा बहाणा; कुख्यात गजाननचा पोलिसांना चकमा, कारागृहाबाहेरून पळाला

googlenewsNext

अमरावती : विनयभंग व मारहाणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या गजानन आत्राम नामक कुख्यात आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. जिल्हा मध्यवर्ती कारागृहाबाहेर १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी रात्री १०.१५ च्या सुमारास गजाननविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

गाडगेनगर पोलिसांनी गजानन अरुण आत्राम (४०, रा. अशोकनगर) याच्याविरुद्ध तीन दिवसांपूर्वी विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणी अटक केल्यानंतर १३ ऑगस्ट रोजी गाडगेनगर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने गाडगेनगरचे पोलीस अंमलदार संजय सगणे हे गजानन आत्रामला जेलदाखल करण्यासाठी सायंकाळच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहाबाहेर पोहोचले; मात्र ती वेळ आरोपींच्या रिलिफची असल्याने सगणे यांना थोडा वेळ थांबावे लागले. त्याचवेळी गजाननने लघुशंकेचा बहाणा केला. त्यामुळे सगणे हे त्याला कारागृहाबाहेरील सागवानच्या जंगलातील मोकळ्या जागेत घेऊन गेले. त्यावेळी आरोपी गजानन हा सगणे यांच्या हाताला झटका देऊन तारेच्या कंपाऊंडमधून पळून गेला. तत्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात पोलीस चमू आरोपी गजाननचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच गजानन आत्राम हा कारागृहातून बाहेर आला होता.

पडद्यामागचा घटनाक्रम -
फ्रेजरपुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आरोपीने लघुशंकेचा बहाणा केल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी दुसरा एक घटनाक्रम समोर आला आहे. गजाननने शाैचाचा बहाणा केला. त्यामुळे त्याची हातकडी काढण्यात आली. कारागृहाबाहेर असलेल्या शौचालयात तो गेला. गजाननचा पाय सुजला असल्याने तो पळू शकणार नाही, असे संबंधितांला वाटले. त्यामुळे संबंधित अंमलदार बिनधास्त राहिला. ती संधी साधत गजानन कारागृहाबाहेरच्या जंगलात पळून गेला. नाव न छापण्याच्या अटीवर एका पोलीस अंमलदाराने ही माहिती दिली

Web Title: Notorious Gajanan eludes police, escapes from prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.