विद्युत तार चोरणारी कुख्यात टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2015 12:04 AM2015-08-30T00:04:44+5:302015-08-30T00:04:44+5:30
स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून शुक्रवारी विद्युत तारांची चोरी करणाऱ्या चार आरोपींना जेरबंद केले.
चार आरोपींना अटक : गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून शुक्रवारी विद्युत तारांची चोरी करणाऱ्या चार आरोपींना जेरबंद केले. अनिस खाँ जासिन खाँ (३२), फिरोज खाँ जसिन खा (३४), अब्दुल शकिल अब्दुल रफिक (२३) व हसन ऊर्फ इम्मू निमसुरवाले (२६, रा.सर्व राहणार कारंजा लाड,जि.वाशिम) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. काही महिन्यांपासून आसेगाव, अचलपूर, समरसपुरा परिसरात वीज वितरण कंपनीच्या तांब्यांच्या तारांची चोरी झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
जिल्ह्यातील गुन्ह्यांची कबुली
अमरावती : शेतातील विद्युत खांबावर चढून विद्युत तार चोरीच्या अनेक घटना घडत असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने तपासकार्य हाती घेतले होते. या चोरी प्रकरणात पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी पोलीस निरीक्षक सुधीर हिरडेकर यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करून तपासकार्य आरंभले होते. याप्रकरणाच्या तपासात आरोपी वाशिम जिल्ह्यातील कारजा लांड येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पथकाचे अपर पोलीस अधीक्षक आर.राजा, पोलीस निरीक्षक सुधिर हिरडेकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक नागेश चतरकर, नीलेश सुरडकर यांच्या पथकातील अरुण मेटे, मुलंचद भांबूरकर, त्र्यंबक मनोहरे, देविदास शेंडे, सचीन मिश्रा, गजेन्द्र ठाकरे, सुनिल महात्मे, सतिश शेन्डे, दिनेश कनोजिया यांनी कारजा लाडला जाऊन चारही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीजवळून मोटरसायकल व एक चारचाकी वाहन असा एकूण २ लाख ६८ हजारांचा माल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने ३६ तास तपासकार्य करून आरोपींना अटक केली असून तीन ते चार आरोपी पसार झाले आहेत. त्यांचे शोध कार्य सुरु आहे. या टोळीवर अमरावती जिल्ह्यातील १२ गुन्हांची व अन्य जिल्ह्यातील १५ ते २० गुन्हांची कबुली दिली आहे.
या टोळीत अकोला व वाशिम जिल्ह्यातील आरोपी असल्याचे पोलीस तपासात लक्षात आले आहे. या आरोपीकडून आणखी काही उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.