आता २०२२ मध्ये होणार देशभरातील व्याघ्र प्रगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:48+5:302021-06-18T04:09:48+5:30
चार टप्पे निश्चित, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय अमरावती : दर चार वर्षानी वाघांची प्रगणना केली जाते. आता पुढील ...
चार टप्पे निश्चित, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय
अमरावती : दर चार वर्षानी वाघांची प्रगणना केली जाते. आता पुढील वर्षी सन २०२२ मध्ये देशभरात व्याघ्र प्रगणना होणार असून त्याकरिता चार टप्पे निश्चित करण्यात आले आहे. प्रगणनेचे वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. जून २०२१ ते जुलै २०२२ या दरम्यान प्रगणना करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय व्याघ्र गणना ही सन २०२२ साठी होऊ घातली आहे. त्याकरिता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात पूर्ण करावयाची आहे. एनटीसीएने या प्रगणनेसाठी १० ते २० किमी.चे अंतर घटक मानले आहे. यात मांस प्राण्यांच्या खाणाखुणांचे सर्वेक्षण, तृणभक्षी प्राणी, वनस्पती व मानवी हस्तक्षेप, जमिनीवरील आच्छादन आणि तृणभक्षी प्राण्यांच्या लेंडयांचे सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले आहे. या एकूणच सर्वेक्षणाचे टप्पे देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्था ही उपग्रह माहितीवरुन प्रत्येक लॅंन्डस्केपच्या वैशिष्ट्याबाबतची माहिती गोळा करून पृथकरण केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे टप्प्याची आखणी केली जाईल. त्यानंतर कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने वाघाची घनता काढण्यात येईल. सॉफ्टवेअरच्या मदतीने तृणभक्षी प्राण्याची घनता मोजण्याच्या सूचना वनाधिकारी, कर्मचाऱ्या्ंना देण्यात आल्या आहेत. सन- २०१८ च्या व्याघ्र प्रगणनेनुसार देशात २३५० पट्टेदार वाघांची संख्या असल्याची नोंद करण्यात आली आहे. आता सन २०२२ मध्ये होणाऱ्या व्याघ्र प्रगणनेनुसार वाघांच्या संख्येत किती वाढ होते, याकडे लक्ष लागले आहे.
--------------
ट्रॅप कॅमेऱ्याची महत्वाची भूमिका
कॅमेरा ट्रॅपींगसाठी संरक्षित क्षेत्राचे आकारमान ४०० चौरस किे.मी. ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ब्लॉक निहाय कॅमेरा ट्रॅपींग करावे लागणार आहे. ग्रीडमध्ये वाघाचा वावर असणाऱ्या पायवाटावर दोन्ही बाजूस कॅमेरा ट्रॅपींग करावे लागणार आहे. प्रत्येक ग्रीडला २००६ च्या प्रगणनेत वापरलेला विशिष्ट कोट वापरावा लागणार आहे. ज्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपींग शक्य नाही, त्या ठिकाणी वाघांची विष्ठा गोळा करुन वनकर्मचाऱ्यांना पृथककरणासाठी पाठवावे लागणार आहे.
--------------------
कोट
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची बैठक दोन दिवसांपूर्वीच पार पडली. यात व्याघ्र प्रगणनेचे चार टप्पे निश्चित करण्यात आले आहे. जून २०२१ ते जुलै २०२२ पर्यंत व्याघ्र प्रगणना होणार आहे. अद्यावत प्रणालीचा वापर करण्यात येईल.
- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मुंबई