पाच हजारांवर शिक्षकांची सेवापुस्तिका होणार आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 02:10 PM2018-09-04T14:10:51+5:302018-09-04T14:15:56+5:30
अमरावती जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका आॅनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
जितेंद्र दखने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका आॅनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात प्राथमिक आणि माध्यमिकच्या तब्बल पाच हजारांहून अधिक शिक्षकांचेसेवापुस्तिका आता आॅनलाइन होणार आहे. सेवापुस्तिका आॅनलाईनची प्रक्रिया झेडपीत सुरू आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेची संपूर्ण माहिती देणारे माध्यम म्हणजे त्यांचे सर्व्हिस बुक आहे. जुन्या पोतीसारखे दिसणारे सर्व्हिस बुक आता अस्तित्वहीन होणार आहे. कर्मचारी नोकरीला लागल्यापासून तो निवृत्त होईपर्यंत बढती ग्रेड पे त्यांच्यावर झालेल्या कारवाईची इत्थंभूत माहिती सेवापुस्तिकेत नोंदविली जाणार आहे. यामुळे कागदी गठ्ठे नामशेष होणार आहे. एका क्लिकवर कर्मचाऱ्यांची माहिती मिळावी, यासाठी शिक्षकांसह जिल्हा परिषदेच्या वर्ग २ ते ४ च्या कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक आॅनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सर्व्हिस बुकमधील संपूर्ण माहिती आता आॅनलाईन सेव्ह होणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टीचा अर्जसुद्धा आनलाईन टाकावा लागणार आहे. केंद्र व राज्य शासनाने गव्हर्नर स्वर भर देण्यासाठी अनेक कामे आॅनलाईन केले आहे. त्यात निविदा प्रक्रिया पासून सेवार्थ प्रणालीपर्यंत सगळ्या प्रणाली आॅनलाइन केल्या जात आहेत. अमरावती जिल्हा परिषद आस्थापना स्तरावर नोडल अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून युद्धपातळीवर या कामाला सुरुवात झाली आहे.
गैरप्रकाराला बसणार चाप
कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची आणि सेवानिवृत्तीची तारीख कोणत्या वर्गात किती झाली, पगारवाढीची माहिती कर्मचाऱ्यांविरुद्ध झालेली चौकशीची, कारवाईची माहिती, त्याने घेतलेल्या सुट्यांची माहिती सर्व्हिस बुकात नोंदविली जाते. हे सर्व्हिस बुक अनेकदा जुनी आणि जीर्ण होत होती. परंतु आॅनलाईन प्रक्रियेमुळे हा प्रश्न सुटणार आहे. तसेच खाडाखोड करण्याच्या प्रकारालाही आळा बसणार आहे.
शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेने सुरू आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अधिनिस्थ अधिकाऱ्यांना सेवापुस्तिका आॅनलाइन करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
- नारायण सानप, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन, जि.प. अमरावती