नैसर्गिक आपदग्रस्तांना आता ६ हजारांपर्यंत मदत, एसडीआरएफचे नवे निकष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 07:31 PM2018-01-28T19:31:44+5:302018-01-28T19:31:58+5:30
केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणा-या आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.
अमरावती : केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणा-या आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश महसूल व वनविभागाने २५ जानेवारीला जारी केला आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित व्यक्तींना मदत देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अर्थात स्टेट डिझॉस्टर रिस्पॉन्स फंड एसडीआरएफची स्थापना करण्यात आली. त्यात सन २०१५ ते २०२० या कालावधीकरिता मदतीच्या दराचे सुधारित निकष निश्चित केलेत. त्यामधील काही बाबीत सुधारणा करण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास किंवा घरे पूर्णत: वाहून गेल्यास वा पूर्णत: क्षतिग्रस्त झाल्यास त्या कुटुंबांना प्रतिकुटुंब २५०० रुपये व घरगुती भांडी व वस्तू नुकसानीसाठी २५०० रुपये मिळणार आहेत. अंशत: पडझड झालेल्या घरांच्या नुकसानरपाईमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. पक्या व कच्चा घरांची १५ टक्के पडझड झाली असल्यास प्रतिघर ६ हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय पडझड वा नष्ट झालेल्या झोपडीधारकाला प्रतिझोपडी ६ हजार रुपये मदत मिळेल.
राज्य शासनाच्या सक्षम प्राधिका-याने बाधित झालेले घर हे अधिकृत असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक असेल. याशिवाय बाधित झालेल्या झोपडीधारकाला मदत देण्यापूर्वी राज्य व जिल्हास्तरीय अधिका-यांनी झोपडे म्हणून प्रमाणित करणे अनिवार्य केले आहे.