आता युवा स्वाभिमानचा प्रशासकीय लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:04 PM2018-02-07T22:04:52+5:302018-02-07T22:05:11+5:30
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी न्यायालयीन कोठडीत असलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे. त्यांना ठोठावण्यात आलेला दंड माफ करावा, यासाठी युवा स्वाभिमान पार्टीने प्रशासकीय लढा सुरू केला आहे. त्याअनुषंगाने बुधवार ७ फेब्रुवारी रोजी युवा स्वाभिमान पार्टीच्या नेत्या नवनीत राणा यांच्या नेतृत्वात अपर जिल्हाधिकारी के.आर. परदेशी आणि विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांना निवेदन देण्यात आले.
२०१२ साली कापसाला योग्य हमीभाव मिळत नसल्याच्या मुद्यावरून आमदार रवि राणा यांनी तिवसा येथे अमरावती-नागपूर महामार्गावरील पेट्रोलपंप चौकात रास्तारोको आंदोलन छेडले होते. दरम्यान, एसटीची तोडफोड करण्यात आली. तिवसा पोलिसांनी आमदार राणांसह एकूण ३९ शेतकरी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणात ३८ जणांना जामीन मिळाला होता. आमदार रवि राणा यांनी जामीन नाकारला.
नापिकीमुळे त्यांच्याकडे मुळीच पैसे नाहीत. ५०० रुपये भरणेही त्यांच्यासाठी कठीण आहे. ते सराईत गुन्हेगार नसल्याने आणि आंदोलनाचे स्वरूप लक्षात घेता आपण त्यांना दंडाच्या रकमेत सूट द्यावी. न्यायासनास पुन्हा विनंती आ. राणा यांनी केली. मात्र, ही मागणी अमान्य केल्याने न्यायालयाने आ.राणासह अन्य सहकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत सुनावली. सन २०१२ मध्ये राणा यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे तत्कालीन सरकारने दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यावेळी शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी आ. रवि राणा यांनी लढाई लढली. त्यामुळे शासनाने आता शेतकºयांचा दंड माफ करावा तसेच शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे केली. यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष राजू रोडगे, ज्योती सैरीसे, मयुरी कावरे, दिनेश टेकाम, रश्मी घुले, मीनल डकरे, जया तेलखडे, प्रदीप थोरात, संजय हिंगासपुरे, सुमती ढोके, आशिष गावंडे, सपना ठाकूर, अनूप अग्रवाल, नीलेश भेंडे, रौनक किटुकले, नितीन बोरेकर, अभिजित बोरकर, विलास वाडेकर, शैलेश कस्तुरे, नील निखार, महानंदा पवार, गिरीश कासट, आशिष कावरे, पांडुरंग गायगोले, सिद्धोधन शिरसाट, हरिदास मिसाळ, दिनेश पवार, राजेंद्र काळपांडे, नितीन अनासने आदी उपस्थित होते.
बडनेऱ्यात रास्ता रोको
दोन ठिकाणी निदर्शने : आ.राणांच्या अटकेची मागणी
बडनेरा : आ. रवि राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्या निषेधार्थ बुधवारी बडनेरात युवा स्वाभिमानीतर्फे रास्ता रोको करण्यात आला. बडनेरातील दोन ठिकाणी कार्यकर्त्यांनी टायर जाळून या कारवाईचा निषेध दर्शविला.
तिवस्यात शेतकरी समर्थनात आंदोलन करणाऱ्या रवि राणा यांच्यासह २८ कार्यकर्त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली. या कारवाईचा विरोध दर्शविण्यासाठी युवा स्वाभिमानीचे कार्यकर्ते बुधवारी रस्त्यावर उतरले. युवा स्वाभिमानीचे अजय जयस्वाल, मनोज गजभिये, विलास वाडेकर, महेश भारती, बंडू सरोदे, मंगेश चव्हाण, नितीन सोळंके, पवन भिंडा, संकेत चोरे, शुभम कैथवास, कैलास बहुराशी, शुभम विटोळे, राहुल कैथवास आदी कार्यकर्त्यांनी आरडीआयके महाविद्यालयासमोर व यवतमाळ टिपाईन्टवर रास्ता रोको केला.