आता महाविद्यालयात परीक्षा आवेदन अर्जही ऑनलाईन; अमरावती विद्यापीठाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 06:29 PM2018-04-25T18:29:18+5:302018-04-25T18:29:18+5:30
विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आधारबेस्ड माहिती
अमरावती : पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी महाविद्यालयात परीक्षेचे आवेदनपत्र भरावे लागते. मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं परीक्षा आवेदन अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
अमरावती विद्यापीठांतर्गत अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाच जिल्ह्यांत ३८२ महाविद्यालये आहेत. पाच लाख विद्यार्थी संख्या असलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं विद्यार्थीभिमुख उपक्रम राबवण्याचा ध्यास घेतला आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या प्रयत्नांनी परीक्षा विभागात आमूलाग्र बदलदेखील करण्यात आले आहेत. याच अंतर्गत विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनाची अर्ज प्रकिया ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यात कोणतेही दोष किंवा उणिवा राहू नये, यासाठी प्राचार्य ए.बी. मराठे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीचे गठन करण्यात आले. त्यामुळे येत्या शैक्षणिक सत्रापासूनआवेदन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुकर होणार आहे.
आता महाविद्यालयात प्रवेशाच्यावेळी विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी, पात्रता व परीक्षा अशा तीन प्रकारच्या माहितीचे फॉर्म भरून द्यावे लागणार आहे. ही माहिती आधारबेस असणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्यावेळी दिलेल्या माहितीचा ऑनलाईन डेटा, कागदपत्रं स्कॅन करून महाविद्यालयांना विद्यापीठात तो ऑनलाइन पाठवावे लागणार आहेत. परीक्षेचं हॉल तिकीट, परीक्षा केंद्र निश्चित करण्याचे अधिकार हे विद्यापीठाकडे राहणार आहेत. परीक्षेचे शुल्क महाविद्यालयातच भरावं लागणार आहे.
अशी भरावी लागेल तीन प्रकारची माहिती
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेताना तीन प्रकारचे अर्जाचे नमुने भरावे लागणार आहे. यात ‘अ’ प्रकारात कायमस्वरूपी माहितीत आधार क्रमांक, मतदार क्रमांक, स्वत:सह आई-वडिलांचे नाव अशी संपूर्ण माहिती असेल. ‘ब’ प्रकारात विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रवेश, नामांकनसंदर्भात माहिती असेल. तर ‘क’ प्रकारात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे नाव, विषयांसह परीक्षेबाबतची माहिती भरावी लागेल. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून, संबंधित प्राचार्यांना सदर माहिती तपासून मान्यता द्यावी लागणार आहे.