आता आॅटोरिक्षाची प्री-पेड प्रवासी वाहतूक
By admin | Published: February 20, 2016 12:37 AM2016-02-20T00:37:31+5:302016-02-20T00:37:31+5:30
आॅटो चालकांच्या मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी आता शहरात आॅटोची प्री-पेड प्रवासी वाहतूक सुरु होण्याचे संकेत आहे.
पोलिसांचा निर्णय : रस्ता सुरक्षा प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविणार
अमरावती : आॅटो चालकांच्या मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी आता शहरात आॅटोची प्री-पेड प्रवासी वाहतूक सुरु होण्याचे संकेत आहे. शहर पोलीसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आॅटो चालकांना वाहतुकीची शिस्त लागणार असून सोबतच प्रवाश्यांसाठी हा निर्णय सोयीचे ठरणार आहे. ही पध्दत कार्यान्वीत करण्यासाठी पोलीस विभागाने बैठकीचे आयोजन केले असून प्री-पेड प्रवासी वाहतुकीचा प्रस्ताव रस्ता सुरक्षा प्राधिकरणाकडे मान्यतसाठी पाठविण्यात येणार आहे.
कारंजा येथील अपूर्वा देऊळगावकर या महाविद्यालयीन तरुणीच्या अमरावतीत अपघाती मृत्यू झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावेळी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने काही मार्गावर जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली. दरम्यान, राज्याचे गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनीही पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाहतुकीसंदर्भात सुधारणा सुचविल्या होत्या. त्यानुसार पोलीस विभाग कामाला लागल्याचे चित्र आहे.
नागरिकांची फसवणूक थांबेल
प्री-पेड प्रवासी वाहतुकीमुळे नागरिकांना प्रत्येक मार्गावरील प्रवासी वाहतूकीचे दर माहिती राहणार आहे. त्यामुळे आॅटो चालक प्रवाश्यांकडून अतिरिक्त पैसे घेऊ शकणार नाहीत. तसेच रात्रीच्या वेळेत आॅटो चालक मनमानी पैसे आकारून प्रवाशाची फसवणूक करतात. त्यावरही अंकुश बसणार आहे. त्यातच दर निश्चित झाल्यामुळे प्रवासी व आॅटो चालकांचा पैशाबाबत वाद सुध्दा हाणार नाही. असा उद्देश पोलीस विभागाचा आहे.