आता जिल्हा उपनिबंधक राहणार बाजार समित्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:37+5:302021-06-05T04:10:37+5:30
अमरावती : बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आता जिल्हा उपनिबंधक जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. याबाबत राज्य शासनाने नुकताच ...
अमरावती : बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आता जिल्हा उपनिबंधक जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. याबाबत राज्य शासनाने नुकताच आदेश जारी केला.
यापूर्वी पाच कोटींच्या आत महसूल असलेल्या कृषिउत्पन्न बाजार समित्यांसाठी जिल्हा उपनिबंधक हे जिल्हा निवडणूक अधिकारी होते. त्यापुढे महसूल असलेल्या बाजार समित्यांचे जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज हाताळत होते. परंतु, आता नवीन आदेशानुसार सर्वच बाजार समित्यांची कमान जिल्हा उपनिबंधकांकडे आहे. अमरावती जिल्ह्यात १२ कृषिउत्पन्न बाजार समित्या, तर राज्यभरात ३२५ बाजार समित्या आहेत. बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप-शिवसेना युती शासनकाळात कायद्यामध्ये बदल केला होता. यामध्ये १० गुंठ्याच्या वर शेती असलेला शेतकरी बाजार समितीचा मतदार होता. मात्र, २०१९ मध्ये सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी शासनाने पहिल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय रद्द केला. याशिवाय जिल्हाधिकारी हे बाजार समितीचे जिल्हा निवडणूक अधिकारी न राहता, यापुढे जिल्हा उपनिबंधक हे कामकाज हाताळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
बॉक्स
विद्यमान संचालक मंडळाला तीनदा मिळाली मुदतवाढ
गतवर्षापासून राज्यभरात काेरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यातील १२ कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला सरकारने सलग तीन वेळा मुदतवाढ दिली. शासनाने संचालक मंडळाला दिलेली ही मुदतवाढ ३० सप्टेंबरपर्यत आहे. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर बाजार समितीच्या संचालक मंडळाला पुन्हा मुदतवाढ द्यायची की निवडणूक घ्यायची, याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोट
बाजार समित्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कामकाज पाहत होते. परंतु, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशानुसार यापुढे बाजार समित्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कामकाज पाहणार आहेत.
संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक, अमरावती