आता रक्तसंक्रमण नको; नॉकोची उच्चस्तरीय समिती
By admin | Published: May 9, 2017 12:04 AM2017-05-09T00:04:26+5:302017-05-09T00:04:26+5:30
दूषित रक्ताच्या पुरवठ्यामुळे रूग्णांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी नॅशनल एड्स आॅर्गनायझेशन (नॉको) ने उच्चस्तरिय समिती स्थापन केली आहे.
सीएस, डीएचओंचा समावेश : एङस्ची लागण रोखण्यावर विशेष भर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दूषित रक्ताच्या पुरवठ्यामुळे रूग्णांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी नॅशनल एड्स आॅर्गनायझेशन (नॉको) ने उच्चस्तरिय समिती स्थापन केली आहे. ही समिती आता जिल्हास्तरावरही स्थापन होणार असून रक्तसंक्रमणामुळे होणारे आजार रोखण्यावर भर दिला जाणार आहे.
रक्तसंक्रमणामुळे एड्सची लागण होत असल्याच्या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारने दूषित रक्ताचा पुरवठा होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी रक्तसंक्रमणामुळे २,२३४ जणांना मृत्युला सामोरे जावे लागले होते. ही आकडेवारी लक्षात घेता यामुळे ८४ जण मृत्युमुखी पडले होते. सन २०१३-२०१४ वर्षात अशुद्ध रक्ताचा पुरवठा झाल्यामुळे २५ जणांना एडस्ची लागण झाली होती. सन २०१४-२०१५ यावर्षात ४२ जणांना तर सन २०१५-२०१६ मध्ये १८ जणांना बाधा पोहोचल्याची बाब समोर आली होती. रक्तसंक्रमणामुळे एड्सची होणारी लागण लक्षात घेता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘नॉको’ संस्थेने याबाबत सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ही उच्चस्तरिय समिती गठित केली आहे. ही समिती आता जिल्हास्तरावरही कामकाज बघणार आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या समितीत जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश असेल. ते अशुद्ध रक्तासंदर्भात माहिती घेतील. इतकेच नव्हे तर रक्तपेढ्या, रक्तदान शिबिरांवरही हे अधिकारी लक्ष ठेऊन राहतील. रक्तपेढ्यांमध्ये आवश्यक कर्मचारी वर्ग नेमण्याचे अधिकार देखिल जिल्हास्तरिय समितीकडे सोपविण्यात आले आहेत. मात्र, जनजागृतीमुळे एड्सचे रूग्ण कमी झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसते. आता या दिशेने अधिक प्रयत्न समितीमार्फत केले जाणार आहेत.
रक्तसंक्रमणामुळे आजार होणार नाही, ही काळजी घेतली जाते. परंतु शासनाने याबाबत समिती गठित करण्याचे धोरण आखले असेल तर ही बाब चांगली आहे. शासनाच्या आदेशानुसार समितीचे कामकाज केले जाईल.
- अरुण राऊत
शल्य चिकित्सक,
जिल्हा सामान्य रुग्णालय.