आता ‘बेसिक पोलिसिंग’चे धडे द्यायचेत का ?

By admin | Published: November 4, 2016 12:39 AM2016-11-04T00:39:01+5:302016-11-04T00:39:01+5:30

पोलीस दलात २० ते २५ वर्षे सेवा देणाऱ्या पोलीस निरीक्षकांना आता बेसिक पोलिसिंगचे धडे द्यायचेत का,

Now do you want to teach basic policing? | आता ‘बेसिक पोलिसिंग’चे धडे द्यायचेत का ?

आता ‘बेसिक पोलिसिंग’चे धडे द्यायचेत का ?

Next

पोलीस आयुक्तांची खंत : अधिनस्त यंत्रणेचा असहकार
प्रदीप भाकरे  अमरावती
पोलीस दलात २० ते २५ वर्षे सेवा देणाऱ्या पोलीस निरीक्षकांना आता बेसिक पोलिसिंगचे धडे द्यायचेत का, अशी खंत व्यक्त करीत शहर पोलिस आयुक्तांनी अधिनस्त यंत्रणेच्या असहकार्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. फ्रेजरपुरा आणि गाडगेनगरच्या ठाणेदारांनी तक्रार दाखल करण्यास चालविलेली टाळाटाळ आणि त्यानंतर पीडितांनी आयुक्तालयात घेतलेली धाव, यापार्श्वभूमिवर पोलीस आयुक्तांनी ही खंत व्यक्त केली.
पालकमंत्र्याच्या आकस्मिक धाडीनंतर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी आठवडाभरापासून ‘आॅल आऊट आॅपरेशन’ राबविले. यात अनेक ठिकाणी मद्यपींची धरपकड करण्यात आली. आयुक्तांनी गाडगेनगरच्या हद्दीत गांजासुद्धा पकडला. २३ आॅक्टोबरपासून आयुक्तांच्या निर्देशाने हाती घेण्यात आलेल्या विशेष नाकाबंदीमध्ये ५ हजार ३०० पेक्षा अधिक वाहने तपासण्यात आलीत. त्यापैकी ८६० वाहनांवर कारवाई करण्यात आली. दोन मद्यपी ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’मध्ये सापडले. ९१गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. याशिवाय पकड वॉरंटमधील ५ आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी आयुक्त रस्त्यावर उतरलेत. ‘आॅपरेशन आॅल आऊट’ या नावाने ही मोहीम राबविण्यात आली. मात्र, त्यानंतर बहुतांश पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयुक्तांशी असहकार्याचा एल्गार पुकारला. शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश देऊनही ते सुरूच राहिल्याने पालकमंत्र्याच्या संतापाचा कडेलोट झाला. त्याचा परिपाक म्हणून आयुक्तांनी अधिनस्त यंत्रणेला ‘टाईट’ केले. विशेष म्हणजे शहरातील अवैध धंद्यांवर वचक बसविण्यासाठी ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली; त्यांनीच आयुक्तांना चुकीचे ‘फिडिंग’केले. शहरात कुठेही उघडपणे अवैध धंदे सुरू नसल्याचा दावा त्या अधिकाऱ्याने केल्याने आयुक्त गाफिल राहिले. ती फसगत आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर ‘आॅपरेशन आॅल आऊट’ला गती आली. दस्तुरखुद्द आयुक्तच रस्त्यावर उतरल्याने ‘क्राईम रेट’ मंदावला. मात्र, त्याचवेळी गुन्हे दडपण्याची लागण झाली. फ्रेजरपुरा पोलिसांनी अत्याचारग्रस्त तरूणीला परत पाठविले तर दुसरीकडे गाडगेनगरचे ठाणेदार कैलास पुंडकर यांनी ट्रक चोरी प्रकरणाची फिर्याद घेण्यास नकार दिला. आपल्या कार्यकाळात गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे, हे दाखविण्याचा वृथा खटाटोप त्यांनी केल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले. अत्याचारग्रस्त तरूणीने तर थेट आयुक्तांचे दालन गाठून फिर्याद नोंदविली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंजाब वंजारी यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. प्रोफेशनल आणि सोशल पोलिसिंगचा गाजावाजा होत असताना आणि पोलीस महासंचालक त्यासाठी आग्रही असताना अनुभवी पोलीस निरीक्षकांना आता कुठल्या प्रकरणात गुन्हे दाखल करायचेत आणि कोणत्या प्रकरणात करायचे नाहीत, याचे धडे द्यायचे काय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सोबतच ट्रक चोरीची फिर्याद न घेणाऱ्या गाडगेनगरच्या ठाणेदारावर कारवाईचे संकेत दिलेत. अत्याचारग्रस्त तरूणी व तरूण आंतरधर्मिय असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक आहे. मात्र, ते समजून न घेता आणि ती बाब वरिष्ठांच्या कानावर न घालता तक्रार दाखल करू न न घेताच तरुणीला परत कसे पाठविले जाते, यावर आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त केले. आपल्या अशा शिलेदारांवर आता काय कारवाई करायची, अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Now do you want to teach basic policing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.