आता ४० ‘ग्रीन जीम’ संच खरेदीसाठी ई-निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:04+5:302021-07-31T04:14:04+5:30
अमरावती : वादग्रस्त ठरलेल्या ‘ग्रीन जीम’ साहित्य खरेदीसाठी आता नव्याने ४० संच खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याकरिता ...
अमरावती : वादग्रस्त ठरलेल्या ‘ग्रीन जीम’ साहित्य खरेदीसाठी आता नव्याने ४० संच खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याकरिता १ कोटी ४३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी स्थायी समितीने २३ संच ई-निविदेविना खरेदीचा प्रशासनाकडून आलेला प्रस्ताव फेटाळला होता.
आयुक्त प्रशांत रोङे यांनी बांधकाम विभागाला ई-निविदाविना कोणतेही साहित्य, वस्तू खरेदी करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे स्थायी समितीने ई-निविदेविना २३ ग्रीन जीम साहित्य संच खरेदीसाठी प्रशासनाचा डाव उधळून लावला, हे आता स्पष्ट झाले आहे. अगोदर ग्रीन जीम साहित्य दर करारानुसार खरेदी करण्याचे प्रस्तावित केले होते. २३ संच खरेदीसाठी ७० लाख ३२ हजार ९४० रुपयांच्या अतिरिक्त वाढीव कामास मंजुरी स्थायी समितीकडे प्रशासनाने मागितली होती. आता ४० ग्रीन जीम संच खरेदीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याकरिता ई-निविदा राबविली जाणार आहे. यापुढे ग्रीन जीम संच चांगल्या दर्जाचे उपलब्ध होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
-------------------
आयुक्तांच्या सूचनेनुसार ग्रीन जीम संच खरेदीसाठी नव्याने ई-निविदा प्रक्रिया राबविली जाईल. नियमानुसार जी एजन्सी निश्चित होईल, त्यानंतर स्थायी समितीची मान्यता प्रदान करून कार्यारंभ आदेश दिले जातील.
- रवींद्र पवार, शहर अभियंता, महापालिका.