आता मांत्रिकालाही मिळणार शंभर रुपये! आरोग्य यंत्रणा भूमकांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 08:53 PM2023-03-27T20:53:16+5:302023-03-27T20:54:10+5:30

Amravati News एक जीव लाखमोलाचा असून, प्रत्येक रुग्णाला वाचविण्यासाठी आरोग्य खात्याला मेळघाटात थेट मांत्रिकाच्या दारी जावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

Now even the wizard will get a hundred rupees! Health system roles | आता मांत्रिकालाही मिळणार शंभर रुपये! आरोग्य यंत्रणा भूमकांच्या दारी

आता मांत्रिकालाही मिळणार शंभर रुपये! आरोग्य यंत्रणा भूमकांच्या दारी

googlenewsNext

नरेंद्र जावरे

अमरावती : पुरोगामी राज्याच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्रात आदिवासी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी खुद्द आरोग्य यंत्रणेला भोंदूबाबा मांत्रिकांची मदत घ्यावी लागत आहे. एक जीव लाखमोलाचा असून, प्रत्येक रुग्णाला वाचविण्यासाठी आरोग्य खात्याला मेळघाटात थेट मांत्रिकाच्या दारी जावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. मांत्रिकाला या भागात भूमका असे म्हटले जात असून, आता रुग्णांना रुग्णालयात रेफर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी मंगळवारपासून दोनदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन धारणी आणि चिखलदरा तालुक्यात करण्यात आले आहे. रुग्ण कल्याण समितीच्यावतीने भूमकांना एका रुग्णापोटी शंभर रुपये मानधन दिले जाणार आहे.

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणावर आरोग्य यंत्रणेच्यावतीने दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. असे असले तरी कुपोषण, माता- बालमृत्यू कायम आहे. आठ वर्षांपूर्वी प्रशासनाने मेळघाटातील भूमकांची मदत घेऊन आदिवासींना उपचारांसाठी रुग्णालयात येण्याचे आवाहन केले होते. मात्र, कुठलाही आर्थिक मोबदला मिळत नसल्याने भूमकांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आता पुन्हा मंगळवारपासून धारणी व चिखलदरा तालुक्यात तज्ज्ञ डॉक्टर त्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

भूमकांची संख्या सहाशेच्या घरात

मेळघाटच्या धारणीत ३१५, तर चिखलदरा तालुक्यात २८६ असे एकूण ६०१ भूमिका आहेत. संपूर्ण गावावर भूमकाचा पगडा अद्याप कायम असल्यामुळे मेळघाटातील आदिवासी उपचारासाठी सर्वप्रथम त्यांच्या दारी जातात त्यानंतरच आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल होतात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि रुग्ण दगावतात. अनेकदा उपचाराच्या नावावर बाळाला चुलीवरच्या धगधगत्या निखाऱ्यावर विळा तापवून त्याचे चटके दिल्याच्या संतापजनक घटना घडल्या आहेत.

प्रसूतीसाठी दाईला चारशे रुपये

मेळघाटात मोठ्या प्रमाणात घरीच प्रसूती होते. त्यामुळे बाळ आणि माता दोघांचेही आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी मातेला रुग्णालयात प्रसूतीसाठी आणल्यास दाईला चारशे रुपये दिले जातात. आता मांत्रिकालाही प्रति रुग्णापोटी शंभर रुपये मिळणार आहेत.

 

मेळघाटातील आदिवासी रुग्णाचा एक जीव जरी वाचला तरी तो लाखमोलाचा ठरेल. याच चांगल्या हेतूने आरोग्य विभागाच्यावतीने भूमकांसाठी दोन दिवस प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

- दिलीप रणमले

जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती.

Web Title: Now even the wizard will get a hundred rupees! Health system roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार