आता मास्क नसल्यास पाचशे रूपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:15 AM2021-02-11T04:15:12+5:302021-02-11T04:15:12+5:30
अमरावती : कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन दक्षता न पाळणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ...
अमरावती : कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन दक्षता न पाळणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले. त्यानुसार स्वच्छता व सार्वजनिक शिस्त न पाळणा-यांवर दंडात्मक कार्यवाहीसाठी पथके गठित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी, चेहऱ्यावर मास्क कायम वापरणे तसेच शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास प्रथमवेळी आढळल्यास पाचशे रुपये दंड तर दुसऱ्यांदा आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तोंडाला मास्क न लावल्याचे आढळून आल्यास प्रथमतः पाचशे रुपये दंड तर दुसऱ्यांदा आढळून आल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे.
दुकानदार, फळभाजीपाला विक्रेते तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास (दोन ग्राहकांमध्ये तीन फूटाचे अंतर न राखणे व विक्रेत्यांनी मार्किंग न करणे), ग्राहकाला तीनशे रुपये तर संबंधित दुकानदार, विक्रेत्याला तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे. किराणा विक्रेत्याने वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास तीन हजार रूपये दंड व त्यानंतरही तसे आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीने या नियमाचा भंग केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई करण्यासाठी २० पथकांचे गठन करण्यात आले असून, ६० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचा-यांचे मनुष्यबळ त्यासाठी तैनात करण्यात आले आहे.
00000