आता रेतीचोरट्यांवर ‘एफआयआर’
By Admin | Published: September 27, 2016 12:11 AM2016-09-27T00:11:01+5:302016-09-27T00:11:01+5:30
रेती तस्करांची वाढती दादागिरी आणि मध्यरात्री होणाऱ्या रेतीचोरीवर अंकूश ठेवण्यासाठी ....
तहसीलदारांचे आदेश : रेती तस्करांचे धाबे दणाणले
धारणी : रेती तस्करांची वाढती दादागिरी आणि मध्यरात्री होणाऱ्या रेतीचोरीवर अंकूश ठेवण्यासाठी आता थेट पोलिसांत ‘एफआयआर’ दाखल करण्याच्या सूचना तहसीलदार अशोक देवकर यांनी दिल्याने रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे ‘लोकमत’मध्ये याबाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशित केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
तालुक्यातील तापी, गडगा, सिपना यानद्यांसह अनेक नाल्यांमधून रेतीचे अवैध खनन अहोरात्र सुरू असते. मनाई असताना सुद्धा हा प्रकार सुरूच आहे. रेती तस्करांनी त्यांचे तगडे नेटवर्क जागोजागी तैनात केले असून अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी निघताच त्याची सूचना भ्रमणध्वनीवरून त्यांना मिळते. त्यामुळे या रेती तस्करांपर्यंत पोहोचणे कठीण झाल्याची माहिती तहसीलदार अशोक देवकर यांनी दिली. मात्र, यापुढे आता मध्यरात्री अवैध रेतीतस्करी करताना आढळल्यास थेट पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तशा तोंडी सूचना संबंधित नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. रेती तस्कर ज्याप्रकारे नेटवर्क पसरवून स्वत:चे कातडे वाचविते त्याच धर्तीवर आता रेती तस्करांविरूद्ध कारवाई करण्याकरिता महसूल विभागानेसुद्धा सापळे रचण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहेत. या कृतीमुळे अवैध रेती खननावरही अंकूश लागण्याची चिन्हे आहेत. (तालुका प्रतिनिधी)
नेत्यांचा अधिकाऱ्यांवर दबाव
महसूल विभागाद्वारे महत्प्रयासाने सापळे रचून पकडलेले अवैध रेतीचे ट्रॅक्टर सोडून द्यावेत, यासाठी अनेक नेते तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. याची कारणमीमांसा केली असता बहुतांश रेतीचे ट्रॅक्टर्स हे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मालकीचे किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस कारवाई न करता दंडात्मक कारवाईचा दबाव अधिकाऱ्यांवर टाकला जात असल्याची परिसरात चर्चा आहे.