आता वाघानंतर खवल्या मांजराची आंतरराष्ट्रीय तस्करी; हाडांचे दुखणे व उत्तेजक औषधांसाठी होतो वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 07:00 AM2021-11-19T07:00:00+5:302021-11-19T07:00:02+5:30
Amravati News हाडांचे दुखणे आणि उत्तेजक औषधी निर्मितीसाठी बाहेरील अतिशय टणक असलेल्या खवल्या मांजराची आंतरराष्ट्रीय तस्करी केली जात आहे.
गणेश वासनिक
अमरावती : हाडांचे दुखणे आणि उत्तेजक औषधी निर्मितीसाठी बाहेरील अतिशय टणक असलेल्या खवल्या मांजराची आंतरराष्ट्रीय तस्करी केली जात आहे. त्याअनुषंगाने वन्यजीव विभागाने आतापर्यंत खवल्या मांजराची झालेली शिकार, विक्री करणारे रॅकेट आदींची माहिती गोळा केली जात आहे.
वाघांची आंतरराष्ट्रीय तस्करी सर्वश्रुत आहे. मात्र, वन विभागाच्या नोंदी शेड्युल्ड-१ मध्ये गणल्या जाणाऱ्या खवल्या मांजराच्या अवयवाची विदेशात तस्करी होते, अशा गुप्त माहितीच्या आधारे राज्याच्या वन्यजीव विभागाने गत पाच वर्षात खवल्या मांजरांची शिकार आणि अटकेतील आरोपींचा लेखाजोखा मागविला आहे. खवल्या मांजराचे अवयवांना विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दिल्ली व्हाया नेपाळ मार्गे तस्करी अवयवांची तस्करी केली जाते. त्यामुळे नेमके कोणत्या भागात खवल्या मांजराची शिकार झाली. यापूर्वी खवल्या मांजर बाळगणारे आरोपी आढळून आले, याचा कसून शोध घेतला जात आहे. वन विभागाकडून विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही आरोपींवर नजर ठेवली जात आहे. राज्य शासनाने हा प्राणी दुर्मिळ व संकटग्रस्त घोषित केला असून, त्याचा संरक्षणासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
खवल्या मांजराच्या पाठीचा भाग टणक
खवल्या मांजराचे अवयव अतिशय टणक असते. त्याचा अवयवापासून मनुष्याच्या हाडाचे दुखणे दूर करण्यासाठी औषधांची निर्मिती होते. तसेच उत्तेजक औषध निर्मितीसाठी खवल्या मांजराचे अवयव वापरले जातात, अशी वन खात्याला माहिती आहे. चीन, अमेरिका, सौदी अरब या राष्ट्रमध्ये खवल्या मांजराच्या अवयवयांची मागणी आहे. सौदर्य प्रसाधने, औषधी, शोभेची वास्तू निर्मितीसाठी खवल्या मांजराचे अवयव वापरले जातात.
दिल्ली व्हाया चीन अवयव विक्रीचे केंद्र
खवल्या मांज़र हे अतिशय दुर्मिळ असा प्राणी आहे. मात्र, गत काही महिन्यांपासून रानावनात खवल्या मांजर शोधून शिकार करणारी चमू वाढली आहे. घनदाट जंगल, दुर्गम, अती दुर्गम भागात खवल्या मांजराचा संचार आढळून येतो. विशेषत: विदर्भासह कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, मुंबई, जळगाव येथेही शिकारीच्या घटना झालेल्या आहेत. दिल्ली व्हाया चीन असा खवले मांजराच्या तस्करीचा मार्ग आहे.
खवल्या मांजर हा प्राणी संकटग्रस्त आहे. मात्र, त्याच्या संरक्षणासाठी वन विभाग, स्वयंसेवी संस्था तोकड्या पडू लागल्या आहेत. चीन या देशात खवल्या मांजराच्या अवयवाची मागणी आहे.
- यादव तरटे पाटील, वन्यजीव संरक्षक अमरावती.
खवल्या मांजर सुरक्षिततेसाठी रात्रीचे पेट्रोलिंग सुरू केले आहे. शिकार होऊ नये, यासाठी जनजागृती केली जात आहे. जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. गैरसमजुतीमधून खवल्या मांजराची शिकार केली जात आहे.
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वन संरक्षक, वन्यजीव विभाग.