आता फक्त एक दिवस...

By admin | Published: September 21, 2016 12:12 AM2016-09-21T00:12:38+5:302016-09-21T00:12:38+5:30

कोपर्डी येथील अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी सुमारे पाच लाख मराठे गुरुवारी येथील गर्ल्स हायस्कूल चौकात उभे ठाकणार आहेत.

Now just a day ... | आता फक्त एक दिवस...

आता फक्त एक दिवस...

Next

पाच लक्ष मराठे उतरणार रस्त्यावर : प्रचंड उत्साह, समाजाची उत्सुकता शिगेला
अमरावती : कोपर्डी येथील अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी सुमारे पाच लाख मराठे गुरुवारी येथील गर्ल्स हायस्कूल चौकात उभे ठाकणार आहेत. कोट्यवधी मराठ्यांच्या आत्मसन्मानाच्या या लढ्याला आता केवळ एक दिवस शिल्लक असल्याने एकीकडे नियोजन अंतिम टप्यात आले आहे. दुसरीकडे समाजातील सर्व घटकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गुरुवार २२ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता नेहरूमैदानातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. राज्यात सर्वदूर होत असलेले मराठ्यांचे मोर्चे 'रेकॉडब्रेक' होत असल्याने या अस्मितेच्या आणि स्वाभिमानाच्या लढ्यात उतरण्याचा लाखो मराठ्यांनी चंग बांधला आहे. अमरावतीचा मोर्चा न भुतो न भविष्यती करण्यासाठी आक्रमक मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. या मोर्चात गाव खेड्यातून लोंढेच्या लोंढे धडकणार असल्याने महापालिका व पोलीस प्रशासनाने बैठकींचा सपाटा लावला आहे. कित्येक वर्षानंतर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठा एकत्र आला असून त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक मराठा हरखून गेला आहे. अमरावती जिल्ह्याचा मराठा क्र ांती मोर्चा 'रेकॉर्डब्रेक' करण्यासाठी सकल मराठा बांधव एकत्र आले असून त्या एकतेची चुणूक गुरुवारी अनुभवायला मिळणार आहे. (प्रतिनिधी)

या आहेत प्रमुख मागण्या
कोपर्डी येथील घटनेतील गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय त्वरित घेण्यात यावा, मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरावर स्वतंत्र वसतिगृहे आणि स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रे उभारण्यात यावीत, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्याकरिता आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला त्वरित शासकीय मदत आणि शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, शेतमालाला योग्य तो भाव देऊन बहुसंख्येने शेतकरी असलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हा मराठा क्रांती मूकमोर्चा काढला जात आहे.

गुरुवारी शहरबस बंद
मराठा क्रांती मूकमोर्चाच्या अनुषंगाने गुरुवार २२ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर शहरबसेस बंद ठेवण्यात येणार आहेत. नेहरु मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात येणार असल्याने शहरबस बंद राहतील. याची नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी केले आहे.

शाळा बंद ठेवा -अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघ
मराठा मोर्चाची व्यापकता लक्षात घेता २२ ला जिल्ह्यातील शिक्षण संस्था बंद ठेवण्याबाबत निर्णय घेऊन तसे आदेश निर्गमित करावेत, अशी विनंती जिल्हा शिक्षण संस्था संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मराठा मूकमोर्चाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी तसेच याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याबाबत निर्णय घेऊन तसे आदेश निर्गमित करण्याची विनंती संघाच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शहरात कलम ३३ (१) (ब)
२२ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मूकमोर्चा काढला जात आहे. मोच्यार्साठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहनांसह नागरिक नेहरू मैदानात एकत्रित होतील. हा मोर्चा नेहरु मैदान-राजकमल चौक-जयस्तंभ चौक-मालविय चौक-इर्विन चौक-गर्ल्स हायस्कूल चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मार्गात वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्या दृष्टीने पोलीस उपायुक्त शशीकुमार मिना यांनी शहरात २२ सप्टेंबरला सकाळी ८ ते मोर्चा संपेपर्यंत बहुतांश मार्गावरील वाहतुक बंद करुन इतर मार्गाने वळविण्याबाबत आदेश पारित केले आहे.

Web Title: Now just a day ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.