आता गाव पातळीवरही खरीप हंगामाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:26+5:302021-06-04T04:11:26+5:30
चांदूरबाजार : तालुका कृषी विभागाने मे महिन्याच्या सुरवातीला तालुक्यातल्या २०२१-२०२२ च्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. आजतागायत हे नियोजन ...
चांदूरबाजार : तालुका कृषी विभागाने मे महिन्याच्या सुरवातीला तालुक्यातल्या २०२१-२०२२ च्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. आजतागायत हे नियोजन फक्त तालुकास्तरावर मर्यादित होते. दरवर्षीप्रमाणे कृषी विभाग यावर्षी एवढ्यावरच थांबला नाही. शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचा विचार करून तालुका कृषी विभागाने आता गाव पातळीवरही खरीप हंगामाचे नियोजन असा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष गावात जाऊन गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांना पीकनिहाय, पेरणीपूर्व व पेरणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर १० टक्क्यांनी कमी करावा, यावर भर दिला जात आहे. कृषी विभागाच्या मंडळनिहाय शेतकऱ्यांच्या, खरीप हंगामपूर्व बैठक घेण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात हैदतपूर वडाळा, थुगाव पिंपरी, करजगाव खेल चौधर, पांढरी याठिकाणी गाव पातळीवरही खरीप नियोजनाच्या शेतकऱ्यांसोबत बैठकीत घेण्यात आल्या.
खरिपाच्या गावनिहाय नियोजनातून नैसर्गिक आपत्ती वगळता, तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाणार नाही, याची पुरेपूर काळजी कृषी विभाग घेत असल्याचे दिसून येते. या नियोजन बैठकांमध्ये शेतकऱ्यांना मुख्यत्वे करून, कापूस व सोयाबीन पिकासंदर्भात पेरणीपूर्व व पेरणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. प्रथम बियाणे व खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी, यासंबंधीची सविस्तर माहिती शेताकऱ्यांना देण्यात आली.
गाव पातळीवरही खरीप हंगामाच्या नियोजन बैठकीप्रसंगी पहिल्या टप्प्यातील बैठकांना तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, मंडळ कृषी अधिकारी एस.पी.दांडेगावकर, कृषी सहायक एस. एस. सांगळे, कृषिमित्र संतोष नागापूरे, कृषीतज्ज्ञ मेघा जामोदकर उपस्थित होते.