आता घरमालकांना द्यावी लागणार भाडेकरूंची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:10 AM2021-01-09T04:10:44+5:302021-01-09T04:10:44+5:30
अमरावती : शहरातील घरमालकांनी भाडेकरूंची संपूर्ण माहिती आता पोलिसांना देणे बंधनकारक राहणार आहे. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या ...
अमरावती : शहरातील घरमालकांनी भाडेकरूंची संपूर्ण माहिती आता पोलिसांना देणे बंधनकारक राहणार आहे. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाने त्या आशयाचे पत्र विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांनी शुक्रवारी जारी केले.
घरमालकांना भाडेकरूंची माहिती पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत संकेत स्थळावर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहराचा विस्तार दिवसोंदिवस होत असून, नांदगावपेठ येथील पंचतारांकित एमआयडीसी कार्यान्वित झाली तसेच उच्चशिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शहरात विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर वास्तव्यास राहावे लागत आहे. यापूर्वी शहरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या भाडेकरूंची माहिती संबधित पोलीस ठाण्यात समक्ष येऊन उपलब्ध करणे सर्व घरमालकांना बंधनकारक करण्यात आले होते. परंतु, बहुतांश घरमालक ही माहिती उपलब्ध नसल्यामुळे एखादेवेळी पोलिसांना त्यांना शोधणे कठीण होते.
पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या संकल्पनेतून शहर पोलीस दलाच्या अधिकृत संकेत स्थळावर भाडेकरूंची माहिती पोलीस विभागाला देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बॉक्स:
अशी अपलोड करावी लागणार माहिती
शहर पोलीस दलाच्या अधिकृत संकेत स्थळावर ‘अवर इम्पोर्टंट सर्व्हिस’ यावर क्लिक केल्यानंतर ‘टेंट इन्फर्मेशन सबमिशन’ या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम घरमालकांना त्यांची माहिती सादर करावी लागणार आहे. त्यांना युनिक क्रमांक उपलब्ध होईल. यानंतर भाडेकरूंची तपशीलवार माहिती अद्यावत करावी लागणार आहे. ज्या घरमालकाकडे एकापेक्षा जास्त भाडेकरू राहत असतील, त्या सगळयांची माहिती ‘ॲड टेंट इन्फर्मेशन’ या टॅबवर क्लिक करून उपलब्ध करून द्यायची आहे.