आता छोटे व्यावसायिकही मालगाडीने पाठविणार माल
By Admin | Published: April 18, 2016 12:06 AM2016-04-18T00:06:31+5:302016-04-18T00:06:31+5:30
छोट्या व्यावसायिकांना थेट मालगाडीने माल पाठविता यावा, यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे.
३१ मे पर्यंत बुकिंग : उत्पन्नवाढीसाठी रेल्वेचा पुढाकार
अमरावती : छोट्या व्यावसायिकांना थेट मालगाडीने माल पाठविता यावा, यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याकरिता देशाच्या कानाकोपऱ्यात माल पाठविण्यासाठी ३१ मेपर्यंत बुकींग करणे अनिवार्य असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. उत्पन्न वाढीसाठी हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वेत मालगाडीने माल पाठविण्याकरिता मोठे व्यापारी धजावतात. मात्र मालगाडीने माल पाठवायचे झाल्यास लहान, सहान व्यावसायिक पुढाकार घेत नाही. परंतु आता छोट्या व्यावसायिकांना व्यापार वृद्धिंगत करण्याची संधी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. मालगाडीच्या एका वॅगनमध्ये ६४ टन माल पाठविता येतो. त्यानुसार ३१ मेपर्यंत माल, बूक करण्यात आल्यास तो व्यावसायिकांना ठरावीक ठिकाणी पाठविता येईल. त्याकरिता संपूर्ण मालगाडी बूक करण्याची गरज भासणार नाही, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. रेल्वे सेवेशी लहान, सहान व्यावसायिक जोडलो जावेत, हा यामागील मुख्य उद्देश असून भुसावळ विभागातून माल पाठविण्यासाठी ३१ मेपर्यंत माल पाठविण्यासाठी बुकिंग झाल्यास संबंधित व्यापाऱ्यांचा माल निश्चित ठिकाणी रेल्वे पोहोचवेल. या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ रेल्वे प्रशासनाचे उत्पन्नात वाढ करणे होय. छोट्या व्यावसायिकांना रेल्वेने मालवाहतूक करणे फारच त्रासदायक राहते. कारण संपूर्ण मालगाडी रॅक बुकिंग करणे छोट्या व्यापाऱ्यांना परवडणारे ठरत नाही. मात्र रेल्वेने छोट्या व्यापाऱ्यांचा माल निश्चित ठिकाणी पाठविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
रेल्वे प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी रिकाम्या जागांवर बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुलाची निर्मिती करण्याचा संकल्प घेतला आहे. रेल्वेत अनेक उपक्रम राबवून तिजोरी भरली जात असताना मालवाहतुकीतही आमूलाग्र बदल करण्यात आला आहे.
भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकावर बुकिंग
छोट्या व्यापाऱ्यांना मालगाडीने माल पाठविण्याची संधी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमांतर्गत भुसावळ मध्य रेल्वे विभागातील मुख्य रेल्वे स्थानकावर माल पाठविण्यासंदर्भात बुकिंग केली जाईल. यात जंक्शन असलेल्या रेल्वे स्थानकावर ही सुविधा उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच छोट्या व्यापाऱ्यांना त्यांचा माल पाठविण्याची सोय करून देण्यात आली आहे. ही बाब निश्चितच व्यापाऱ्यांसाठी लाभदायक ठरणारी आहे. लहान व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यामागील मूळ उद्देश आहे.
- व्ही. डी. कुंभारे,
वाणिज्य निरीक्षक, अमरावती रेल्वे स्थानक