हायवेवर आता ‘मोबाईल’ दारुविक्री
By Admin | Published: May 8, 2017 12:06 AM2017-05-08T00:06:58+5:302017-05-08T00:06:58+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवेवर दारुबंदी झाली, हे खरे आहे.
पोलीस अनभिज्ञ : ब्रॅण्ड सांगा ; १० मिनिटांत दारू उपलब्ध, दारूबंदीनंतरचा नवा फंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवेवर दारुबंदी झाली, हे खरे आहे. मात्र, आता राज्य महामार्गावर मोबाईल दारुविक्रीचा नवा फंडा विक्रेत्यांनी शोधून काढला आहे. दारूचा केवळ ब्रॅण्ड सांगितला की अवघ्या १० मिनिटात पाहिजे ती दारू उपलब्ध करुन दिली जाते. मोटरसायकलद्वारे मोबाईल दारुविक्री सुरु झाली आहे.
मद्यप्राशन करुन वाहने चालविली जात असल्याने हायवेवर अपघातांची संख्या वाढली होती. नेमकी हीच बाब सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे मांडली गेली. परिणामी हायवेपासून ५०० मीटर अंतरावर सर्व प्रकारच्या दारु विक्रीला लगाम लावण्यात आला आहे. मात्र, याच हायवेवर आता दारुबंदीनंतर फिरती दारुविक्री सुरु झाली आहे. नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एखादे वाहन थांबल्यास काही क्षणात एखादी दुचाकी येऊन धडकते. दुचाकीवरून आलेल्या तरुणांकडून ‘सर वाईन हवी काय’ अशी विचारणा केली जाते. वाहनातील व्यक्तींनी होकार देताच लगेच कोणता ब्रॅण्ड हवा, असे विचारले जाते. बॅ्रण्ड आणि किंमत ठरताच १० मिनिटांत दुचाकीवरील दोन युवकांपैकी एक दारु आणायला जातो.
जादा दराने
सर्रास दारूविक्री
अमरावती: अवघ्या काही मिनिटांत ग्राहकाच्या सूचनेनुसार दारु आणून दिली जाते. तिवसा ते कोंढाळी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोबाईल दारुविक्रीचा व्यवसाय सुरु झाला आहे. हायवेवर बियर बार, वाईन शॉपला टाळे लागल्याने याच दुकानांमधील नोकरांनी मोबाईल दारूविक्रीच्या माध्यमातून रोजगार मिळविण्याची नवी शक्कल लढविल्याची माहिती आहे. हायवेवरून जाणाऱ्या वाहनांमध्ये महिला आढळल्यास तेथे दारू हवी का, अशी विचारणा केली जात नाही, हे विशेष. त्यामुळे हायवेवर दारुबंदी झाली असली तरी मद्यपींना अगदी सहजरित्या मनासारखा ‘ब्रॅण्ड’ मिळत असल्याचे वास्तव आहे.
भरारी पथकाची जबाबदारी वाढली
हायवेवर मोबाईल दारुविक्री सुरु झाल्यामुळे पोलीस आणि एक्साईज विभागाची जबाबदारी वाढली आहे. हायवेवरील दारूविक्री रोखण्याच्या उद्देशाने दारू दुकाने बंद करण्यात आली होती. आता त्याच हायवेवर ‘मोबाईल दारुविक्री’ची नवी समस्या निर्माण झाली आहे. एक्साईजच्या भरारी पथकाला आता मोबाईल दारुविक्री थांबविण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. यामुळे पोलीस प्रशासनाचे काम वाढले आहे.
हायवेवर जिल्ह्याच्या हद्दीत मोबाईल दारुविक्री रोखण्यासाठी फिरत्या पथकाकडे विशेष जबाबदारी सोपविली जाईल. मोबाईल दारुविक्रेत्यांवर कायदेशिर कारवाई केली जाईल.
- प्रमोद सोनोने
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अमरावती.