आता बंदीजनांच्याही हालचाली ‘ईन कॅमेरा’
By admin | Published: November 23, 2015 12:15 AM2015-11-23T00:15:11+5:302015-11-23T00:15:11+5:30
येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची प्रत्येक हालचाल आता कॅमेऱ्यात कैद होणार आहे.
अधीक्षकांचे नियंत्रण : बराकीत लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची प्रत्येक हालचाल आता कॅमेऱ्यात कैद होणार आहे. सद्यस्थितीत कारागृहात चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले तरी उर्वरित १६ बराकींमध्ये कॅमेरे बसविण्याचा मानस कारागृह प्रशासनाचा आहे. मात्र, हे कॅमेरे बसविण्यासाठी निधीची वानवा आहे.
अमरावती मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्ब स्फोट, प्रसिध्द खून खटले, नक्षलवाद्यांसह विविध कुख्यात गुन्ह्यातील आरोपी शिक्षा भोगत आहेत. हे कारागृह अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत योग्य असल्यामुळे येथे अलिकडे मुंबई येथीलल २६/११ च्या हल्ल्यातील काही आरोपींना ठेवण्यात आले आहे. तोकड्या मनुष्यबळाची समस्या नित्याचीच असताना सुध्दा कारागृह प्रशासनाने नवीन तंत्रज्ञानाची कास धरली आहे. सद्य:स्थितीत बंद्यांची मुलाखत, दर्शनीभाग, कार्यालयाचे कामकाज व आतील प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चारही ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण अधीक्षकांकडे ठेवण्यात आले आहे. परंतु एकूण १७ बराकींपैकी १६ बराकीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव आहे. यात महिला आणि पुरुष बंदींच्या बराकीचा समावेश आहे. प्रत्येक बराकीत किमान दोन असे एकूण १६ कॅमेरे बसवून कारागृहातील कैद्यांच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत.
मध्यवर्ती कारागृह हे नागरीवस्तीत आल्यामुळे याच्या बाह्यसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र, तरीही परिसरात होमगार्ड तैनात करुन सुरक्षा केली जात आहे. सुरक्षा मनोऱ्यावर २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे कारागृहाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा करताना बराकीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बंदीजनांच्या हालचालींकडे लक्ष ठेवले जाणार आहे. या नवीन प्रयोगामुळे बंदीजनांच्या गैरकृत्यांना आळा बसेल, हे वास्तव आहे. (प्रतिनिधी)