आता वाघांचे आॅनलाईन दर्शन, मेळघाटात राज्यातील पहिला प्रयोग, वरिष्ठ वनाधिका-यांच्या परिषदेत प्रात्यक्षिक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 04:41 PM2017-09-17T16:41:19+5:302017-09-17T16:42:17+5:30
द-या-खो-यात विस्तारलेल्या मेळघाटात आता व्याघ्रांचे दर्शन आॅनलाईन होणार आहे. त्याकरिता प्रवेशद्वारावर पर्यटकांचा ‘बायोडाटा’ संगणकात कैद होणार असून दिवसभरात किती जणांनी भेटी दिल्यात, याची माहिती एका ‘क्लिक’वर मिळेल. वाघांचे आॅनलाईन दर्शन घडविणारे मेळघाट राज्यात पहिला व्याघ्र प्रकल्प ठरेल.
- गणेश वासनिक
अमरावती, दि. 17 - द-या-खो-यात विस्तारलेल्या मेळघाटात आता व्याघ्रांचे दर्शन आॅनलाईन होणार आहे. त्याकरिता प्रवेशद्वारावर पर्यटकांचा ‘बायोडाटा’ संगणकात कैद होणार असून दिवसभरात किती जणांनी भेटी दिल्यात, याची माहिती एका ‘क्लिक’वर मिळेल. वाघांचे आॅनलाईन दर्शन घडविणारे मेळघाट राज्यात पहिला व्याघ्र प्रकल्प ठरेल.
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी क्षेत्रफळाच्या तुलनेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प सर्वात मोठा आहे. वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचा संचार असून सागवान व दुर्मिळ वनौओषधींसाठी प्रसिद्ध आहे. आदिवासीबहुल मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सुमारे ४० ते ४५ वाघांची संख्या आहे. तथापि इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत पर्यटकांची गर्दी खेचण्यात मेळघाट माघारले आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख विकास प्रबोधिनी प्रशिक्षण संस्थेत पार पडलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ वनाधिकाºयांच्या परिषदेत मेळघाटचे सौंदर्य, व्याघ्रांचे दर्शन पर्यटकांना घेता यावे, यासाठी ‘फॉरेस्ट ट्रान्झिस्ट पास’ आॅनलाईन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
ही ट्रांझिस्ट पास कशी असेल, याबाबत प्रधान मुख्य वनसचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री.भगवान यांच्या विशेष उपस्थितीत प्रात्यक्षिकही झाले. व्याघ्रांचे दर्शन, जंगल सफारी, दुर्मिळ स्थळांना भेटी, नरनाळा किल्ल्याची पाहणी, सेमाडोह, चिखलदरा, ढाकणा व कोहाकुंड येथील निसर्गरम्य स्थळांना भेटी आदींचा जंगल सफारीत समावेश राहणार आहे. लवकरच मेळघाटात ‘व्याघ्रांचे आॅनलाईन दर्शन’हा अभिनव उपक्रम सुरू होणार आहे. तत्पूर्वी व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. प्रत्येक प्रवेशद्वावर इंटरनेटची सुविधा असावी, यासाठीदेखील वनविभाग आग्रही आहे. त्यानुसार व्याघ्र दर्शनाच्या आॅनलाईन प्रणालीसाठी एजन्सी नेमली जाणार असल्याची माहिती आहे.
या प्रवेशद्वारावर असेल पर्यटकांची नोंद
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्रवेश मिळण्यापूर्वी प्रवेशद्वारावर नोंद करावी लागेल. त्यानंतरच व्याघ्रांचे आॅनलाईन दर्शन घेता येईल. यात खटकाली, धूळघाट, धामणगाव गढी, सेमाडोह, बिहाली, टेभ्रुसोंडा, जारिदा, धारणी, वैराट, मेमना, कोहा, कुंड, ढाकणा, पोपटखेड आदी प्रवेशद्वारांचा समावेश राहिल.
अशी असेल ‘ट्रांझिस्ट’ पास
मेळघाटात व्याघ्रदर्शन घेताना प्रत्येक पर्यटकांचा ‘बायोडाटा’ आॅनलाईन राहिल. त्याकरिता वनविभागाकडून पर्यटकांना ‘ट्रांझिस्ट’ पास दिली जाईल. यात पर्यटकांच्या प्रवेशाची तारीख, वेळ, प्रवेशद्वार क्रमांक, नाव, मोबाईल क्रमांक, वाहनक्रमांक, वाहनांचा प्रकार, पर्यटकांची एकूण संख्या, शुल्क रक्कम, बाहेर पडणाºया प्रवेशद्वाराचा क्रमांक आदी बाबी समाविष्ट राहतील.
किती पर्यटकांनी भेटी दिल्यात आता हे एका ‘क्लिक’वर कळू शकेल. व्याघ्र प्रकल्पाचा कारभार आॅनलाईन करताना प्रवेशद्वारावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जातील. जेणेकरून प्रवेशद्वारातून कोणत्या वाहनांची ये-जा झाली, हे क्षणात कळू शकेल.
- एम.एस.रेड्डी,
क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प