ठिबकसाठी आता आॅनलाईन नोंदणी
By Admin | Published: May 12, 2017 01:37 AM2017-05-12T01:37:08+5:302017-05-12T01:37:08+5:30
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना २०१७-१८ या वर्षाकरिता सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी ....
बदल : लाभामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना २०१७-१८ या वर्षाकरिता सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करणे व शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्याकरिता ‘ई-ठिबक’ आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. ही आज्ञावली १ मे २०१७ पासून सुरू होत आहे. या आज्ञावलीवर शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदणी करण्यास व शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. ही आज्ञावली १ मे २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सुरू राहणार आहे. ई-ठिबक आज्ञावलीवर शेतकरी नोंदणीसाठी लाभार्थ्यांचा आधार क्रमांक हाच लाभार्थ्यांचा लॉग ईन आयडी राहील. शेतकरी अर्जामध्ये अर्जदारांची संमती असल्याबाबत सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार संबंधित माझ्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्यास माझी सहमती आहे या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे. ई-ठिबक आज्ञावली केंद्र शासनाच्या डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर) पोर्टलशी जोडण्यात येत आहे. यास्तव अर्जदाराच्या जन्मदिनांकाचा समावेश शेतकरी नोंदणी अर्जात केला आहे. लाभार्थी नोंदणीसाठी आधार कार्ड यंत्रणेद्वारे आधार कार्डचा डाटा ई- ठिबक आज्ञावलीशी संलग्न करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. तोपर्यंत लाभार्थ्यांना आधार अपलोड करण्याची सुविधा निर्माण करून दिली आहे. शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतर स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध अनुदानाच्या मयार्देत आॅनलाईन पूर्वसंमती प्रदान करण्यात येईल.
पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांचे ३० दिवसांच्या कालावधीत सुक्ष्म सिंचन संच बसवून, देयकाची प्रत ई-ठिबक आज्ञावलीवर "अपलोड" करणे बंधनकारक आहे. विहीत कालावधीत शेतकऱ्यांनी देयकाची प्रत अपलोड न केल्यास लाभार्थ्यांचा अर्ज ई-ठिबक आज्ञावलीतून आपोआप रद्द करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. लाभार्थ्याचा अर्ज रद्द झाल्यानंतर पूर्व संमती आपोआप रद्द होईल. तथापी लाभार्थ्यांस योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा अर्ज करता येईल. शेतकऱ्याला स्वयं घोषणापत्र देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे. अर्जामध्ये संच उत्पादक व वितरक यांचा समावेश असणार नाही. संच उत्पादकांचे व वितरकाचे नाव बील इन्व्हाईस एंट्रीनंतर मोका तपासणीच्या वेळी घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. पूर्वसंमती प्राप्त केल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीत सूक्ष्म सिंचन संच बसवून ई-ठिबक आज्ञावलीमध्ये बील इनव्हाईस "अपलोड" करणे व अनुदान मागणीचा प्रस्ताव विहीत कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारास विविध टप्प्यावर झालेल्या कार्यवाहीची माहिती मोबाईलद्वारे एसएमएस अलर्ट पाठविण्याची सुविधा निर्माण करण्यात आली असल्यामुळे मोबाईल क्रमांक बिनचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे.