आता पालकही घेणार पोषण आहाराची चव
By admin | Published: December 2, 2015 12:20 AM2015-12-02T00:20:35+5:302015-12-02T00:20:35+5:30
शालेय पोषण आहाराबाबत तक्रारींचा ओघ वाढत आहे. यासंबंधित गावखेड्यातील पालकच पोषण आहाराचा दर्जा ठरविणार आहेत.
दर्जा सुधारणार : अंमलबजावणीस सुरुवात
अमरावती : शालेय पोषण आहाराबाबत तक्रारींचा ओघ वाढत आहे. यासंबंधित गावखेड्यातील पालकच पोषण आहाराचा दर्जा ठरविणार आहेत. या उपक्रमाची मंगळवार १ डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शाळांना शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणीसुद्धा अनिवार्य करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा दर्जा पाहण्यासाठी आता पालकांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक शाळेत दररोज एक पालक मुलासोबत पोषण आहार घेतील. मोबाईलवरून एसएमएसद्वारे संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्याला आहाराचा दर्जा सांगतील.
ज्या शाळांतील आहाराबाबत पालकांच्या तक्रारी आल्यात त्या पुरवठादाराला मालाचे पैसे देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रत्येक शाळेतील पालकांचे दररोज आलेले एसएमएस एकत्रित करुन त्या शाळात पुरवठा होणाऱ्या आहारासंदर्भात अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे.
शाळांमधून दिल्या जाणाऱ्या आहारांमध्ये सातत्य नसल्याची ओरड आणि त्याचबरोबर तांदूळ आणि अन्य कडधान्य निकृष्ठ दर्जाचे असल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमिवर शिक्षण विभागाने ही अनियमितता रोखण्यासाठी पालकांची मदत घेतली आहे. (प्रतिनिधी)