-आता तालुका स्तरावर मिळणार पासपोर्ट
By admin | Published: January 16, 2017 12:11 AM2017-01-16T00:11:36+5:302017-01-16T00:11:36+5:30
पासपोर्ट देण्यात परराष्ट्र मंत्रालयाने सुलभता आणली आहे.
नागरिकांना दिलासा : परराष्ट्र मंत्रालयाचे सकारात्मक पाऊल
अमरावती: पासपोर्ट देण्यात परराष्ट्र मंत्रालयाने सुलभता आणली आहे. विभागीय स्तरावर पासपोर्ट मिळविण्याच्या किचकट प्रक्रियेला आता विराम देत प्रमुख तालुका, पोस्ट कार्यालयात पासपोर्ट देण्याचा विचाराधीन केंद्र शासन आहे. तसेच पासपोर्ट मोबाईल व्हॅन हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ठराविक ठिकाणी पासपोर्ट मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जातात. मात्र, पासपोर्टसाठी मागणी वाढत असल्याच्या पार्श्वभूमिवर आता तालुका स्तरावर पासपोर्ट कार्यालये स्थापन करण्याचा विचार सरू आहे. सामान्य नागरिकांनाही सहजतेने पासपोर्ट मिळावा, यासाठी केंद्र सरकारने योग्य पावले उचलली आहेत. नागरिकांनी पासपोर्ट मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रे घेऊन आता पासपोर्ट मिळेल. पासपोर्ट म्हणजे सामान्य कागद नाही. त्यामुळे पासपोर्ट देताना प्रशासनाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच संबंधितांना पासपोर्ट द्यावा, असे निर्देश परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. पासपोर्ट प्रक्रियेतील अडथळे दूर करून किचकट प्रक्रियेला पूर्णविराम मिळणार आहे. पासपोर्ट मिळण्यासाठी सादर करावयाच्या अर्जात शिथिलता आणली गेली आहे. जन्मतारखेच्या पुराव्याची, आई- वडिलांची नावे नमूद करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आई- वडिलांची नावे माहीत नसलेल्या अनाथ आश्रमातील मुलांना पासपोेर्ट मिळण्यासाठी यामुळे दारे खुली झाली आहेत. याशिवाय सन्यासी, घटस्फोटित, दत्तक व्यक्तिंनाही पासपोर्ट मिळविण्यासाठी आता अर्ज करता येणार आहे. देशात दर दिवशी ५० नागरिकांचे पासपोर्ट जारी केले जात असल्याची माहिती आहे.
असे मिळेल पासपोर्ट
पासपोर्ट मिळण्यासाठी सुलभता आणण्याचा प्रयत्न परराष्ट्र मंत्रालयाने हाती घेतला आहे. आता विभागीय स्तरावर पासपोर्टकरिता अर्ज स्वीकारले जातात. मात्र येत्या काळात प्रमुख पोस्ट कार्यालयातही पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. नागरिकांनी पासपोर्ट मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज केल्यानंतर त्याला मुलाखतीची तारीख दिली जाईल. त्यानंतर संबंधित तारखेला मुलाखतीमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतील.