आता कैद्यांनाही कळणार चालू घडामोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:02 PM2018-06-03T23:02:48+5:302018-06-03T23:03:08+5:30
येथील मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना आता त्यांच्या आवडी-निवडीतील हिंदी, मराठी चित्रपटातील गीते, भावगिते यासह देश, विदेशातील चालू घडामोडींची माहिती मिळणार आहे. रविवारी ‘हॅलो ऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह’ केंद्राचे उद्घाटन कारागृह उपमहानिरिक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना आता त्यांच्या आवडी-निवडीतील हिंदी, मराठी चित्रपटातील गीते, भावगिते यासह देश, विदेशातील चालू घडामोडींची माहिती मिळणार आहे. रविवारी ‘हॅलो ऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह’ केंद्राचे उद्घाटन कारागृह उपमहानिरिक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते झाले.
रेडिओ केंद्राचे उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश विमलनाथ तिवारी, जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, अपर पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार, कारागृह अधीक्षक रमेश कांबळे आदी उपस्थित होते. राज्यात प्रथम रेडिओ केंद्र हे येरवडा मध्यवर्ती कारागृहात सुरू झाले. या माध्यमातून कारागृह अधिकाऱ्यांना बराकीतील बंदीजनांसोबत थेट संवाद साधता यावा, वरिष्ठांच्या सूचना, आदेशाची माहिती देता यावी, ही यामागील संकल्पना आहे. यात यशही मिळाले. मात्र, दुपारी विश्रांतीच्या वेळी बंदीजनांना विरंगुळा मिळावा, यासाठी हिंदी, मराठी गीतांची फरमाईश हा कार्यक्रम खास करून त्यांच्यासाठी सुरू करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकातून कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी सांगितले. सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात रेडिओ व्यवस्थेचा लाभ बंदीजनांना घेता येणार असून, त्यानुसार कारागृहाने वेळापत्रक तयार केले आहे. सायंकाळच्या वेळी देश-विदेशातील चालू घडामोंडीची माहिती बातम्यांच्या शिर्षकासह कैद्यांना रेडिओ केंद्रातून दिली जाणार आहे. थोर महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी या अनुषंगाने काही विचार ऐकायचे असल्यास त्यासाठी विचारवंत, तज्ज्ञांना छोटेखानी रेडिओ स्टुडिओत बोलावून त्यांचे मार्गदर्शनाची संधी कैद्यांनी मिळेल. जॉकी म्हणून सिद्धदोष कैदी सुदर्शन विघ्ने, अमित राठी यांच्याकडे जबाबदारी सोपविली.
बंदीजनांच्या मानसिकतेत होणार बदल
बंदीजनांच्या मानसिकतेत रेडिओ स्टुडिओच्या माध्यमातून निश्चित बदल होईल, असे अपेक्षा कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी व्यक्त केली. बंदीजनांच्या मनात नैराश्य, न्यूनगंडाची भावना आल्यास त्यांच्या कानी संगीतमय गीतांचे स्वर पडताच नक्कीच सकारात्मक बदल होईल, असेही ते म्हणाले.