आता कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्रावर क्यूआर कोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:13 AM2021-04-28T04:13:54+5:302021-04-28T04:13:54+5:30
आयसीएमआर पोर्टलवर उपलब्ध, नावात खोडतोड, अहवालात छेडछाड, दुरुपयोग होणार नाही अमरावती : कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. मात्र, काही ...
आयसीएमआर पोर्टलवर उपलब्ध, नावात खोडतोड, अहवालात छेडछाड, दुरुपयोग होणार नाही
अमरावती : कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. मात्र, काही जणांकडून कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्रावर खोडतेाड करून दुरुपयोग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्रावर क्यूआर कोड, सिक्युरिटी फिचर टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्र पूर्णपणे सुरक्षित असून, यात बदल करता येणार नाही, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कोरोना नमुने चाचणी प्रयोगशाळेतील तांत्रिकी अधिकारी डाॅ. नीरज घनवटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नमुने चाचणी झाल्यानंतर अहवाल निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, याबाबत अनेकांमध्ये धास्ती असते. मात्र, यापूर्वी पुणे, नागपूर येथे
अहवाल बदलून मिळतो, अशा घटना उघडकीस आल्या आहेत. पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या निर्देशानुसार कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्रावर खोडतोड होऊन त्याचा दुरुपयोग होता कामा नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना होत्या. नागरिकांना कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्र हे आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपयोग व्हावा, यासाठी
दोन क्यूआर कोड टाकण्यात आले आहे, असे डॉ. घनवटे म्हणाल्या. आयसीएमआरच्या पोर्टलवर या प्रणाणपत्राच्या सुरक्षेविषयी बाबी नमूद असणार आहे. त्याकरिता नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून, क्यूआर कोट कुठेही जनरेट होणार नाही. कोरोना नमुने चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असो वा निगेटिव्ह यात कोणत्याही बदल करता येणार नाही, अशी नवी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. सिक्युरिटी फिचरमुळे अहवाल प्रमाणपत्र बनावट, खोटे असू शकणार नाही. यातून गैरप्रकाराला आळा बसेल. नवे सॉफ्टवेअर प्रणालीद्धारे ग्रामीण आरोग्य यंत्रणा, जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिका प्रशासनाला कोरोना चाचणी प्रमाणपत्रावर क्यूआर कोड देता येणार आहे. ही प्रणाली सोमवारपासून कार्यान्वित झाल्याचे डॉ. घनवटे यांनी सांगितले.
-------------------
बॉक्स
विद्यापीठ प्रयोगशाळेने २ लाख नमुने चाचणीचा पल्ला गाठला
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची कोरोना नमुने चाचणी प्रयोगशाळा ४ मे २०२० पासून प्रारंभ झाली. २७ एप्रिल रोजी या प्रयोगशाळेने २ लाख नमुन्यांची चाचणी करून अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिला आहे. या २ लाख नमुन्यांपैकी एक लाख नमुने चाचणी केवळ मार्च, एप्रिल २०२१ या दोन महिन्यातील असल्याची माहिती डॉ. नीरज घनवटे यांनी दिली. जिल्ह्यात २६ एप्रिलपर्यंत ४ लाख ४ हजार ६५३ नमुने तपासणी करण्यात आले आहेत.