‘ॲम्फोटेरीसिन बी’ इंजेक्शनचे आता रेशनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:37+5:302021-05-25T04:13:37+5:30
गजानन मोहोड अमरावती : कोविडपश्चात म्युकरमायकोसिसचा आजार जिल्ह्यात पाय फैलावत असताना, त्यावरील प्रभावी इंजेक्शन ॲम्फोटेरीसिन बी, लायपोसोमलची गत रेमडेसिविरसारखी ...
गजानन मोहोड
अमरावती : कोविडपश्चात म्युकरमायकोसिसचा आजार जिल्ह्यात पाय फैलावत असताना, त्यावरील प्रभावी इंजेक्शन ॲम्फोटेरीसिन बी, लायपोसोमलची गत रेमडेसिविरसारखी झालेली आहे. त्यामुळे आता या औषधांचा फक्त शासकीय स्तरावरूनच पुरवठा होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय समिती या इंजेक्शनचे संनियंत्रण करणार आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची संसर्गाची दुसरी लाट आली. ती अद्यापही सुरूच आहे. प्रथम महापालिका क्षेत्रात उद्रेक झाल्यानंतर आता ग्रामीण भागात ‘कोरोना हॉट स्पॉट’ झाले आहेत. गंभीर रुग्ण संसर्गातून बरे झाल्यानंतर त्यांना ‘म्युकरमायकोसिस’ या काळ्या बुरशीच्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेहासारखी सहव्याधी असलेल्या रुग्णांना या आजाराने लक्ष्य केले. उपचारादरम्यान रेमडेसिविर व स्टेराॅईडच्या वापराने प्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराची वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
म्युकरमायकोसिसवर प्रभावी असणारे ॲम्फोटेरीसिन बी, लायपोसोमल इंजेक्शन आज बाजारात उपलब्ध नाही. कंपन्यांकडे पैसे जमा करूनही दुकानदारांना इंजेक्शन मिळत नाही. आता जिल्ह्यास जो पुरवठा होईल, तो शासकीय रुग्णालयात जमा होत आहे व समितीच्या मार्गदर्शनात खासगी रुग्णालयांना वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी ‘लोकमत’ला दिली.
बॉक्स
पाच सदस्यीय समिती
इंजेक्शनवर संनियंत्रनासाठी जिल्हाधिकारी शैलश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अन्न व औषध विभागाचे निरीक्षक मनीष गोतमारे व महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन सानप यांचा समावेश आहे.
बॉक्स
खासगी रुग्णालयांना इर्विनमधून पुरवठा
ॲम्फोटेरीसिन बी, लायपोसोमल इंजेक्शन खासगी रुग्णालयांना उपलब्ध होण्यासाठी त्यांना आवश्यक रकमेेचा धनादेश जिल्हा सामान्य रुग्णालयात जमा करून जिल्हा शल्यचिकित्सकांशी संवाद साधून माहिती द्यावी लागेल, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी जारी केले आहेत.
बॉक्स
एका रुग्णाला किमान सहा इंजेक्शन
म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला ॲम्फोटेरेसिन बी हे दिवसाला तीन ते सहा इंजेक्शन किमान सात ते १४ दिवस द्यावे लागत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली. जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने कंपनीकडे तीन हजार इंजेक्शनची मागणी नोंदविली असल्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स
दोन इंजेक्शन शिल्लक
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, म्युकरमायकोसिसचे जिल्हा सामान्य रुग्णालयात १२ व खासगी रुग्णालयांत १९ रुग्ण दाखल आहेत. सोमवारी लायपोसोमल ॲम्फोटेरीसिनचे १२० इंजेक्शन उपलब्ध झाले व सर्व वितरित करण्यात आले. याशिवाय पोसाकॉनाझोल चार इंजेक्शन प्राप्त झाले. त्यापैकी दोन वाटप करण्यात आल्याने दोन इंजेक्शन शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.