आता बारावीच्या निकालसूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:10 AM2021-07-18T04:10:39+5:302021-07-18T04:10:39+5:30
३०-३०-४० टक्क्यांचा फाॅर्म्यूला ठरला, ५ ऑगस्टपूर्वीच निकाल जाहीर होण्याचे संकेत अमरावती : शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावीच्या ...
३०-३०-४० टक्क्यांचा फाॅर्म्यूला ठरला, ५ ऑगस्टपूर्वीच निकाल जाहीर होण्याचे संकेत
अमरावती : शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांनाही निकालाचे वेध लागले आहे. मात्र, दहावीप्रमाणेच बारावीच्या निकालासाठीही मागील वर्गाची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. दहावीत मिळालेल्या गुणांना ३० टक्के, अकरावीत मिळालेल्या गुणांना ३० टक्के आणि बारावीतील कामगिरीसाठी ४० टक्के भारांक दिला जाणार आहे. मात्र, दहावीत काही कारणास्तव अनेकांना कमी गुण मिळाले. अकरावीत रेस्ट इअर मानले गेले. त्यामुळे या फाॅर्म्युल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत धाकधूक वाढली आहे. राज्य शिक्षण मंडळाने ५ ऑगस्टपूर्वीच निकाल जाहीर होण्याचे संकेत दिले आहेत.
कोट
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा
आता निकालाचे नवीन सूत्र तयार आहे. पण दहावी, अकरावी आणि बारावीत त्याच विद्यार्थ्याचे प्रदर्शन वेगवेगळे असू शकते. दहावीत कमी गुण मिळवलेला विद्यार्थी बारावीत आवडीची शाखा घेऊन अधिक गुण मिळवू शकतो.
- नितीन तायडे, प्राध्यापक
कोट
शासनाच्या नियमानुसार बारावीचे मूल्यांकन होत आहे. पण काही कारणास्तव मागील वर्गात कमी गुण असलेल्या हुशार विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालावर परिणाम होणार आहे. ही बाब यावेळी पालकांनी लक्षात घ्यावी.
-दीपक धोटे, प्राचार्य, ब्रजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावती.
-----
कोट
३० टक्के सूत्र गणित बिघडविणार !
शिक्षकांनी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली. अंतर्गत मूल्यमापन केले. पण दहावी, अकरावीचे गुण विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे मला निकालाविषयी धाकधूक वाटत आहे. कारण दहावीमध्ये कडक सेंटरवरून परीक्षा दिली होती.
- नेहा दिक्षीत, विद्यार्थिनी
दहावी आणि अकरावीचे गुण पकडून तुम्ही नक्कीच पास होणार, अशी खात्री शिक्षकांनी दिली आहे. पण थोडी काळजी वाटते. ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांची मात्र मजा झाली. पास होण्याची गॅरंटी असूनही आनंद मात्र वाटत नाही.
- रितेश देशमुख, विद्यार्थी
-----------------
विभागात बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड १,३८,३६३
मुले: ७५०५९
मुली: ६३३०४