आता रस्त्यांवर पडणार नाहीत खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:48 PM2017-12-31T23:48:45+5:302017-12-31T23:49:43+5:30
खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, असे चित्र नेहमीच पहायला मिळते. नवीन रस्त्यालाही अल्पावधीतच खड्डे पडतात.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, असे चित्र नेहमीच पहायला मिळते. नवीन रस्त्यालाही अल्पावधीतच खड्डे पडतात. रस्ते करण्यासाठी निधी खर्च होतो आणि पुन्हा या रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतरही अतिरिक्त निधी खर्च केला जातो. पण आता ही पद्धत कालबाह्य झाली आहे. आता यापुढे रस्ते करणाऱ्या ठेकेदाराला संबंधित रस्त्याची दोन वर्षे देखभाल दुरूस्ती करावी लागेल तसेच खड्डे भरण्याच्या कामालाही दोन वर्षांचाच निकष राज्य शासनाने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या रस्त्यांवर किमान खड्डे दिसणार नाहीत, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
रस्ते करणारे देयके कंत्राटदार आणि त्यावर पडलेले खड्डे भरणारे निराळे ठेकेदार, असे यापूर्वी चित्र होते. या पद्धतीमुळे एकाच रस्त्यासाठी दोनदा खर्च केला जात होता. परंतु आता सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत गंभीर दखल घेऊन रस्त्यांच्या दर्जाबाबत परिपत्रक काढले आहे. रस्ते करणाऱ्या ठेकेदाराने दोन वर्षे या रस्त्याची देखभाल दुरूस्ती करण्याचा नियम करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने गांभीर्याने देखभाल दुरूस्ती करावी यासाठी बिलातील पाच टक्के रक्कम ठेवी म्हणून विभागाकडे राखीव राहणार आहे. यासह खड्डे भरण्याच्या कामालाही दर्जाचे निकष लागू केले आहे. खड्डा कसा भरावा यासाठी वापरल्या जाणाºया घटकांचे प्रमाण कसे असावे याचे नवे निकष सुचवले आहे. त्याचा दर्जाही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यानी तपासावा, असे स्पष्ट केले आहे. कामात हयगय होता कामा नये, अशा स्वरुपाचा हा जीआर आहे. याचा अर्थ यापुढे नव्या कामांमध्ये दर्जा हा महत्त्वाचा घटक राहणार आहे. जरी रस्ता खराब झाला तर तत्काळ दुरूस्ती करण्याचा नियम करण्यात आला असल्याने यापुढे किमान पूर्वीचे खड्डेयुक्त रस्त्याचे चित्र राहणार नाही.
हा चांगला निर्णय आहे. रस्ते खराब होण्याचे प्रमाण यापुढे निश्चित कमी होईल. दोन वर्षे देखभाल दुरूस्तीचे बंधन घातल्यामुळे संबंधित ठेकेदाराला जबाबदारीने काम करावे लागेल.
- विवेक साळवे,
अधीक्षक अभियंता, सा.बां.वि.