बंडोबांना थंड करण्यासाठी आता राजकीय खेळींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:14 AM2021-01-03T04:14:22+5:302021-01-03T04:14:22+5:30
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारीसाठी खेळी खेळली जात आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ...
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारीसाठी खेळी खेळली जात आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही ठिकाणी हालचाली सुरू आहेत, तर काही ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यासाठी गळ घातली जाणार आहे. माघार घेण्यासाठी जो काही शब्द दिलेला आहे, तो भविष्यात पाळला जाईलच याची खात्री कोण देणार, हा यक्षप्रश्न संबंधितांना सतावत आहे.
ज्या गावात काही पंचवार्षिकमध्ये सरपंचपद खुले आहे, त्या ठिकाणी आरक्षित जागांसाठी रस्सीखेच दिसून येत आहे. दाखल उमेदवारी अर्ज ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर लगेच उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. गावपातळीवर राजकारण कडाक्याच्या थंडीतही चांगलेच तापले आहे. यासाठी अनेक गावातील चौकाचौकांत, पारावर, हॉटेल, धाब्यावर चर्चेचे फड रंगत आहेत. गावाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. भावी सरपंचांचा आखडा तापला असून, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव होत आहे. उमेदवारी अर्ज मोठया संख्येने दाखल झाले असून, आता माघार कोण-कोण घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली असून, आघाड्या व पॅनेलचे गणित बिघडले आहे. बंडखोरी करणाऱ्यांवर माघार घेण्यासाठी दबाबतंत्राचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी आमिषांची आयुधे तयार आहेत. माघारीची मुदत संपेपर्यंत गोडीगुलाबी कायम राहणार आहे.
बॉक्स
सरपंचपदाची शाश्वती नाही
निवडणूकीपूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होत असल्याने पूर्वी इच्छुक निवडणुकीतूनच माघार घ्यायचे. यंदाच्या निवडणुकीत सदस्य निवडीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने निवडणुकीशिवाय पर्याय नाही अन् आरक्षण ठरल्याप्रमाणे निघेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे अनेक इच्छुक ‘ऑक्सिजन’वर आहेत.