आता वन विभागात मजुरांना महिन्याभरातच मिळणार मजुरी

By गणेश वासनिक | Published: April 13, 2023 06:03 PM2023-04-13T18:03:55+5:302023-04-13T18:04:47+5:30

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसाठी निर्णय, मजुरांची भटकंती थांबणार, क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सोपविली जबाबदारी

Now the laborers in the forest department will get their wages within a month | आता वन विभागात मजुरांना महिन्याभरातच मिळणार मजुरी

आता वन विभागात मजुरांना महिन्याभरातच मिळणार मजुरी

googlenewsNext

अमरावती : राज्याच्या वन विभागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रमांसाठी मजुरांकडून कामे केली जातात. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मजुरांना वेळेत मजुरी मिळत नाही. तथापि, आता वन विभागात कार्यरत मजुरांना महिन्याभराचा आत मुजरी दिली जाणार आहे. त्याकरिता क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वनविभागाच्या विविध शाखेअंतर्गत करण्यात येणारी कामे, कार्यक्रम आणि अनिवार्य योजना राबविल्या जातात. राज्यस्तरीय योजना, जिल्हास्तरीय योजना, केंद्र पुरस्कृत योजना, केंद्रीय योजना, कॅम्पा आदींचा समावेश आहे. परंतु, मजुरांना वेळेत मजुरी मिळत नसल्याची ओरड आहे. मजुरांअभावी अनेक योजना, उपक्रम पूर्णत्वास गेले नाहीत, असे अगोदर अनेकदा प्रकार घडले आहे. त्यामुळे राज्य शासनाने वन विभागात मजुरांना महिन्याभरातच मजुरी अदा केली जाईल, असे महसूल व वन विभागाने १० एप्रिल २०२३ रोजी शासनादेश जारी केला आहे. यापूर्वी मजुरांना पाच ते सहा महिन्यापर्यंत मजुरी मिळत नव्हती. आता राज्य शासनाने नवी गाईड लाईन निश्चित केल्यामुळे वन विभागात मजुरांची मजुरी मिळत नसल्याची ओरड नामशेष होणार आहे. 

मजुरांमार्फत ही होतात कामे

वन विभागात विविध क्षेत्रीय घटकांमार्फत वनक्षेत्रांवर वृक्ष लागवड, वनसंवर्धन, वन्यप्राणी संवर्धन आणि व्यवस्थापन यासह कार्य आयोजनेतील व्यवस्थापन आराखड्यातील तरतुदीनुसार कामे केली जातात. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वनेतर क्षेत्रासह दुर्गम, आदिवासी भागात रोजंदारीवर कामे केली जातात. नव्या निर्णयामुळे मजुरांना ठराविक काळात रोजंदारी दिली जाणार आहे.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर अंमलबजावणीची जबाबदारी

वन विभागात मजुरांना वेळेत मजुरी मिळण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर कामांचा कृती आराखडा, अर्थसंकल्पीय वार्षिक अंदाजपत्रक, वार्षिक योजना वा वेळेवर येणारी कामांसाठी प्रस्ताव तयार करणे, कामांचे अंदाजपत्रक तयार करुन सक्षम प्राधिकाऱ्याकडून  तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे, कामांची मंजुरी मिळताच कामांना निधी उपलब्ध करण्याची कार्यवाही करणे, कामास निधी मिळल्यानंतर उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी अथवा वन परिक्षेत्राधिकारी यांचे मंजुरीनंतरच कामे प्रारंभ करावी लागेल. 

- अन्यथा डीएफओ, एसीएफ, आरएफओंवर कारवाई

सन २०२३ -२०२४ या आर्थिक वर्षात वन विभागात विविध घटकांमार्फत वन व वनेतर क्षेत्रावर करण्यात येणाऱ्या 
कामांवरील सर्व मजुरांना एक महिन्याचा आत मजुरी अदा करणे अनिवार्य आहे. मजुरी देण्यास दिरंगाई झाल्यास उपवसंरक्षक, सहायक वनसंरक्षक अथवा वन परिक्षेत्राधिकारी यांना जबाबदार धरुन कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Now the laborers in the forest department will get their wages within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.