गुलाबी थंडी झाली आता बोचरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:41 PM2018-12-29T22:41:50+5:302018-12-29T22:42:30+5:30
शहरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची लाट पसरली असून, गजबजलेले अमरावती शहर सायंकाळीच सामसूम होत असल्याची स्थिती आहे. पारा गेल्या तीन दिवसांपासून १० अंशाच्या खाली स्थिरावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची लाट पसरली असून, गजबजलेले अमरावती शहर सायंकाळीच सामसूम होत असल्याची स्थिती आहे. पारा गेल्या तीन दिवसांपासून १० अंशाच्या खाली स्थिरावला आहे.
गजा या वादळाच्या प्रभावाने पंधरवड्यापूर्वी तापमानात वाढ झाली होती. त्यामुळ पावसाळ्यासारखीच थंडीही अचानक गायब होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, या वादळाचा प्रभाव ओसरताच थंडीने पुन्हा जोर धरला. तीन दिवसांपासून तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे. त्यामुळे ती असह्य झाली आहे. शुक्रवारी पहाटे किमान तापमान ५.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हा गेल्या २० वर्षांतील तापमानाचा नीचांक असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी स्पष्ट केले.
नंदनवनातही पारा घसरला
चिखलदरा पर्यटन स्थळावरील पारा शनिवारी पहाटे ७ अंश सेल्सिअस नोंदविला गेला. १५ दिवसांत दुसºयांदा एवढी कमी नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. किमान ७ व कमाल १६ अंश सेल्सिअसपर्यंत चिखलदरा पर्यटन स्थळाचे तापमान खाली आले आहे. बोचरी थंडीपासून संरक्षणार्थ आदिवासी अंगात गरम कपडे आणि शेकोटीवर चुलीचा आसरा घेत आहेत.
५ जानेवारीपर्यंत थंडी कायम
संपूर्ण विदर्भात थंडीची लाट पुढील ५ जानेवारीपर्यंत कायम राहील. तथापि, त्याची तीव्रता कमी-जास्त होईल, असा अंदाज अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम किनारपट्टीवर चक्राकार वारे वाहत असल्याने मध्य महाराष्ट्रात मात्र थोडा दिलासा मिळणार आहे.
अमरावती गारठली
अमरावती शहरातील रस्त्यांवर उशिरा रात्रीपर्यंत वर्दळ असते. तथापि, तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जाताच तीन दिवसांपासून वर्दळ रोडावल्याची स्थिती आहे. एरवीही शांत राहणाºया कॉलनी परिसरात ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ असतो.