आता जमीन मोजण्यासाठी ‘ईटीएस’ मशीनचा वापर
By Admin | Published: April 21, 2016 12:03 AM2016-04-21T00:03:52+5:302016-04-21T00:03:52+5:30
शहरी आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ झपाट्याने वाढत असून परंपरागत भूमापन पद्धतीला फाटा देत आता नव्याने ‘ईटीएस’ मशीनद्वारे ...
भूमिअभिलेख विभाग गतिशील : डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल
अमरावती : शहरी आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ झपाट्याने वाढत असून परंपरागत भूमापन पद्धतीला फाटा देत आता नव्याने ‘ईटीएस’ मशीनद्वारे जमीन मोजण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. ईलेक्ट्रॉनिक्स टोटल मशीन खरेदीबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु येथील भूमिअभिलेख विभागाने सहा वर्षांपासून ‘ईटीएस’द्वारे भूमापन सुरु केले आहे.
भूमिअभिलेख विभागाचा कारभार देखील अन्य विभागांच्या तुलनेत अद्ययावत व्हावा, यासाठी परंपरागत भूमापनाला फाटा देत ‘ईटीएस’ मशीनचा जमीन मोजण्यासाठी वापर करण्याचे ठरविण्यात आले. जिल्हानिहाय सर्व्हेअरची संख्या लक्षात घेता जमीन मोजण्याकरिता आवश्यक ‘ईटीएस’ मशीनसाठी ७६ कोटींचा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. या मशीनद्वारे जमीन मोजण्याचे काम हाती घेतल्यास वेळेची अथवा मनुष्यबळाची बचत होते. यंत्रयुगातही जमीन मोजण्याचे काम परंपरागत पद्धतीने सुरु होते. ही पद्धत वेळखाऊ असल्यामुळे भूमिअभिलेख विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मात्र, आता ‘ईटीएस’ मशीनचा जमीन मोजण्यासाठी वापर होणार असल्यामुळे किचकट पध्दत सोपी होईल. केंद्र शासनाने डिजिटल इंडिया कार्यप्रणाली अवगत करण्याचे ठरविले असून हे यंत्र त्यास पूरक ठरणारे आहे.