सिंचनासाठी यापुढे नलिका वितरण प्रणालीचा अवलंब
By admin | Published: February 6, 2017 12:07 AM2017-02-06T00:07:27+5:302017-02-06T00:07:27+5:30
उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामध्ये पाण्याचा दाब हा गुरूत्वाकर्षनीय उर्जेद्वारे अभिप्रेत आहे.
जलसंपदा विभागाच्या मार्गदर्शक सूचना : उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापर
गजानन मोहोड अमरावती
उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामध्ये पाण्याचा दाब हा गुरूत्वाकर्षनीय उर्जेद्वारे अभिप्रेत आहे. मात्र विमोचकाखालील नलिकेद्वारे आता सुक्ष्म सिंचनाच्या धोरणाची स्वतंत्ररित्या आखणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सिंचनासाठी नलिका वितरण प्रणालीचा अवलंब करावा लागणार आहे.
वितरण प्रणाली व सिंचन प्रणाली या दोन्ही भिन्न बाबी आहेत. वितरण प्रणालीद्वारे पाणी हे पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रापर्यंत पोहचविणे अभिप्रेत आहे. हे वितरण कालवा बांधकामाची स्थिती, भूसंपादनाची सद्यस्थिती, भुस्तर, भौगोलिक स्थिती व पिकरचना विचारात घेऊन प्रवाही कालवे व नलिकाद्वारे पाण्याचे वितरण होते. यामध्ये तुषार व ठिबक सिंचन असे सिंचनाचे प्रकार आहे. यापुढे नलिका वितरण स्वीकारले तरी सिंचनाची यापैकी कुठलीही एक पद्धती अवलंबिता येते. मात्र उपलब्ध पाणी व लागवडीलायक क्षेत्र विचारात घेता सिंचनाच्या संपूर्ण लाभक्षेत्रात सुक्ष्म सिंचनाचा अवलंब व्हावा, असे जलसंपदा विभागाचे उद्दिष्ट आहे. यासाठी सद्याची वितरण व्यवस्था सुक्ष्म सिंचनास पुरक अशी रुपांतरित करणे, यासाठी जलसंपदा विभागाद्वारा मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यात आली आहे.
लाभक्षेत्रातील जमिनीचा उतार तीव्र असल्यास कमी खर्चात नलिका वितरण प्रणाली संकल्पित करण्यास वाव असतो. यामध्ये जमिनीचा उतार १:५०० पेक्षा असल्यास गुरूत्वाकर्षणाचे उर्जेद्वारे नलिका वितरण करणे व्यवहार्य ठरते. जर लाभक्षेत्रातील जमिनीस मोठ्या प्रमाणावर चढ-उतार असल्यास कालवा बांधकामाचा खर्च वाढतो. तसेच शेतकऱ्यांवरील धबधब्याचा खर्च वाढतो. अशा प्रकरणी बंदीस्त नलिका वितरण हे फायद्याचे ठरते.
खारपाणपट्ट्यात नियंत्रित सिंचनाची गरज
पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात संत्रा व अन्य फळबागांसाठी अत्यंत नियंत्रित सिंचनाची गरज आहे. जास्त पाण्यामुळे फळबागांची उत्पादकता कमी होते, अश्या लाभक्षेत्रासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचा पर्याय आता अन्य निकषांच्या आधारे तपासून पाहण्यात येणार आहे.
पारंपारिक वितरण
प्रणाली ठरते महाग
नवीन प्रकल्पांच्या बाबतीत ज्या प्रकरणी पारंपारिक कालवा वितरण प्रणाली भूसंपादनाच्या खर्चामुळे महाग ठरते. अश्याप्रकरणी अन्य अभियांत्रिकी निकषानुसार नलिका वितरण तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत असल्यास अश्या ठिकाणीही नलिका वितरण व्यवस्था महत्वपूर्ण ठरणार आहे.
व्यहनव्ययाची बचत, पाणीवापर कार्यक्षमतेत वाढ
नलिका वितरण प्रणालीमुळे व्यहनव्ययाची बचत होते व पाणी वापराची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे उपसा सिंचन योजनेमधील भांडवली गुंतवणुकीत तसेच वीज देयकाच्या खर्चात बचत होते. त्यामुळे नवीन उपसा सिंचन योजनेत नलिका वितरण व पारंपारिक वितरण प्रणालीचा तौलनिक अभ्यास करण्यात येणार आहे.
काळ्या मातीच्या लाभक्षेत्रात फायद्याची प्रणाली
काळ्या मातीच्या कार्यक्षेत्रात पाया खोल जात असल्याने कालव्यावरील बांधकामाचा खर्च जास्त येतो. तसेच मुरुम जवळपास उपलब्ध नसल्यास मुरूम लादी भराव व अस्तरीकरणाचे कामाचा खर्च वाढतो. त्यातुलनेत नलिका वितरण प्रणाली ही फायद्याची ठरु शकते, असे मत जलसंपदाच्या अहवालात नमूद आहे.