आता मान्यवरांचे पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक देऊन स्वागत, अल्पसंख्याक विभागासाठी परिपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 06:39 PM2017-08-21T18:39:52+5:302017-08-21T18:40:14+5:30
अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत येणारी सर्व कार्यालये शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहणारे अतिथी अथवा भेटी देणा-या अधिकारी किंवा मान्यवरांचे स्वागत आता...
अमरावती, दि. 21 : अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत येणारी सर्व कार्यालये शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहणारे अतिथी अथवा भेटी देणा-या अधिकारी किंवा मान्यवरांचे स्वागत आता पुष्पगुच्छा ऐवजी पुस्तके देऊन केले जाईल. हा निर्णय शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने शनिवारी घेतला आहे. यासंदर्भाचे परिपत्रक संबंधित विभागांना पाठविण्यात आले आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या अखत्यारित येणारी मंडळे, महामंडळे, क्षेत्रिय कार्यालये, शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित राहतात किंवा अधिकारी भेटी देतात. यावेळी अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याची प्रथा आहे. परंतु नव्या निर्णयानुसार आता पुस्तके देऊन अतिथी, अधिका-यांचे स्वागत केले जाईल.
विद्यार्थी, शिक्षक व समाजातील विविध घटकांमध्ये वाचन संस्कृती व वाचनप्रेरणा वाढीस लागावी, तसेच ज्ञानाचा प्रसार व प्रचार व्हावा, यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या अखत्यारित सर्व मंडळे, महमंडळे, क्षेत्रीय कार्यालयांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे परिपत्रक सहसचिव सं.छ. तडवी यांनी काढले आहे.