आता गुणपत्रिका महाविद्यालयातूनच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:14 AM2021-03-08T04:14:01+5:302021-03-08T04:14:01+5:30
अमरावती : लहान-सहान कामांसाठी विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करतात. मात्र, यापुढे अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका महाविद्यालयांतून मिळेल, असा ...
अमरावती : लहान-सहान कामांसाठी विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करतात. मात्र, यापुढे अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका महाविद्यालयांतून मिळेल, असा निर्णय परीक्षा मंडळाने आभासी बैठकीतून घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांच्या विद्यापीठात अनावश्यक येरझारा थांबणार आहेत.
केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात सन २०१० पासून सत्र पद्धतीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा लागू झाली. त्यानुसार विद्यापीठ, महाविद्यालयांत सत्र पद्धत सुरू झाली. अगोदर अभियांत्रिकी त्यानंतर विधी, फार्मसी, विज्ञान आता सर्वच अभ्यासक्रमांसाठी सत्र पद्धतीच्या आधारे परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु, यापूर्वी एक, दोन, तीन या सत्राच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी उत्तीर्ण नसल्यास चौथ्या सत्राच्या निकालाची गुणपत्रिका विद्यापीठ रोखत होते. सदर विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये राहायचे. मात्र, कालांतराने विद्यार्थी उत्तीर्ण झाले की, विद्यापीठात गुणपत्रिका सादर करून निकाल ‘क्लिअर’ करायचे. यावेळी पाचही जिल्ह्यांतून पालक, विद्यार्थ्यांची होणारी गर्दी ही मोठ्या प्रमाणात असते. गुणपत्रिकांची कामे ही महाविद्यालय स्तरावर व्हावी, असा प्रस्ताव परीक्षा मंडळात मांडला गेला. या प्रस्तावाला सर्वसंमतीने मान्यता प्रदान करण्यात आली. विद्यापीठात केवळ अंतिम सत्राची गुणपत्रिका रोखून ठेवता येईल, असा निर्णय झाला. परीक्षा मंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. सचिवपदी परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख होते. यावेळी प्र-कुगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा मंडळाचे संजय खडक्कार, सी.एच. जाधव, अधिष्ठाता एफ,सी रघुवंशी, अविनाश माेहरील, एस,एम. कतोरे, दिलीप निचत, वैशाली गुडधे, डॉ. राऊत आदींनी परीक्षा मंडळाचा बैठकीत सहभाग नोंदविला.
-------------
विद्यापीठ स्तरावर आता पदवीसाठी अंतिम सत्राच्या अभ्यासक्रमाची गुणपत्रिका रोखण्यात येईल. उर्वरित अन्य सत्र परीक्षांच्या गुणपत्रिका महाविद्यालयातून मिळतील, असा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज नसेल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ