नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी आता झोननिहाय पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:29 AM2021-01-13T04:29:08+5:302021-01-13T04:29:08+5:30
(महापालिका लोगो) अमरावती : मकर संक्रातीच्या पर्वामध्ये पंतगोत्सवात नायलॅान मांजाचा वापर आता अंगलट येणार आहे. या धाग्याची निर्मिती, वापर, ...
(महापालिका लोगो)
अमरावती : मकर संक्रातीच्या पर्वामध्ये पंतगोत्सवात नायलॅान मांजाचा वापर आता अंगलट येणार आहे. या धाग्याची निर्मिती, वापर, खरेदी व साठा यावर एनजीटीच्या आदेशाने बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात पाचही झोनमध्ये पथक नियुक्तीचे आदेश आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. यामध्ये नायलॉन मांजाच्या जप्तीसोबतच पाच हजारांचा दंडही वसूल केला जाणार आहे.
संक्रातीच्या कालावधीत साधारणपणे नायलॉन व कृत्रिम साहित्य वापरून तयार केलेल्या धाग्याचा वापर पतंगबाजीसाठी केला जातो. या धाग्याच्या वापरासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. या मांजाच्या वापरामुळे मानवी जीवितांस तसेच पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात क्षती पोहोचते. त्यामुळे या कालावधीत पक्ष्यांच्या दगावण्याचे प्रमाणात वाढ होते, याशिवाय नायलॉन धागा अविघटनशील असल्यामुळे त्याचे विघटन होत नाही. याशिवाय नायलॉन मांजाच्या संपर्काने विद्युत प्रवाह खंडित होणे, शॉक लागणे तसेच दुचाकीस्वार, पादचारी यांना इजा होणे, किंबहुना जीवितहानी होत आहे. त्यामुळे आता नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातली असून, या मांजाचा वापर करू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.