एनआरएचएममध्ये सावळागोंधळ !

By admin | Published: March 28, 2016 12:14 AM2016-03-28T00:14:33+5:302016-03-28T00:14:33+5:30

जिल्ह्यातील मेळघाटातील साडेचारशे कंत्राटी कर्मचारी गेल्या सहा ते सात वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यक्रम ...

NRHM shabargaadala! | एनआरएचएममध्ये सावळागोंधळ !

एनआरएचएममध्ये सावळागोंधळ !

Next

सहा महिन्यांत महिला कर्मचाऱ्याची बदली : सीईओंना अंधारात ठेवून कामकाज
अमरावती : जिल्ह्यातील मेळघाटातील साडेचारशे कंत्राटी कर्मचारी गेल्या सहा ते सात वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी केवळ एका महिला कर्मचाऱ्यावर विशेष कृपा दाखविली. सदर महिला कर्मचाऱ्यांना सर्व नियम धाब्यावर बसवून नियमबाह्य नियुक्ती व बदलीही दिली. त्यामुळे आरोग्य विभागात चर्चेला उधाण आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या महिला कर्मचाऱ्यांचा मूल्यांकन अहवाल दोन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नकारात्मक दाखविला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात १८०० कंत्राटी कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आरोग्यातील अति महत्त्वाची जबाबदारी असताना त्यांना नियमित करणे तर सोडाच परंतु त्यांची बदलीदेखील केली जात नाही.
इतर जिल्ह्यात त्यांच्या सोयीप्रमाणे बदली प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु येथील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे अमरावती अपवाद आहे. त्यामुळे आमदार, खासदार तर सोडाच परंतु पालकमंत्री यांच्या शिफारसीला अधिकारी बिनधास्तपणे बदलीकरिता नकार देतात. परंतु दिव्याखाली अंधार याप्रमाणे अधिकारी आपल्या मर्जीने कारभार चालवीत असल्याचे तालुका लेखापाल यांची नियुक्ती व बदलीवरून निष्पन्न झाले आहे. मीना राठोड यांच्यावर तत्कालीन सीईओ लांडगे यांनी कर्मचारी संघटनेच्या तक्रारीवरून त्यांची दर्यापूर येथे बदली केली होती.
वर्षअखेर त्यांच्या विरोधात दोन्ही तालुका अधिकाऱ्यांनी नकारात्मक मूल्यांकन अहवाल दिला. रुग्ण कल्याण समिती अंजनगाव बारी येथे सन २००८-०९ मध्ये नियमबाह्य खरेदी केल्यामुळे सन २०१० मध्ये संचालक मुंबई यांच्या पत्रानुसार त्यांची एक वेतनवाढ रोखली आहे.
अशा वारंवार तक्रारी असताना त्यांनी नियमबाह्य नियुक्ती देऊन पुन्हा दर्यापूरवरून अमरावती येथे केवळ सहा महिन्यांत बदली देण्यात आली.
मूल्यांकन अहवाल नकारात्मक असल्याने दरवर्षी कित्येक कर्मचाऱ्यांना पाठविले जात असताना या एका कर्मचाऱ्यावर एनआरएचएम कृपादृष्टी का, असा प्रश्न जिल्ह्यातील १८०० कर्मचाऱ्यांना पडला आहे. राठोड यांच्या या बदलीवर हे एम्प्लॉईज फेडरेशनने आक्षेप देखील घेतला आहे. तरीदेखील सदर महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांकडून वाचविले जात आहे. याप्रकरणाबाबत जिल्हा परिषद सीईओ सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)

आमदार, खासदारांसह पालकमंत्र्यांच्या
पत्राला मात्र केराची टोपली
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान १० वर्षे बदल्या होत नाही, असा जणू आरोग्य विभागाने नियमच केला आहे. परंतु काही शहरांमध्ये तीन वर्षांनंतर बदली केली जात आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदाराची शिफारस असो त्यांनाही येथे कारण दाखविल जाते. एका प्रकरणात जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पत्रावर नुकतेच बदलीचा हा नियम असल्याचे पत्राद्वारे सांगितले आहे. असे असताना राठोड यांच्या बाबतीत अधिकाऱ्यांना हा नियम लागू नव्हता काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांचे मूल्यांकन नकारात्मक असताना नियुक्ती आणि तत्कालिन सीईओंनी नकार दिल्यानंतर नवीन सीईओंच्या माध्यमातून दर्यापूरवरुन अमरावती पुन्हा बदली करण्याचे कारण काय. अखेर त्यांना कुणाचे राजाश्रय आहे, कोण अधिकारी त्यांच्या पाठीशी आहे, असे तर्कवितर्क काढले जात आहे.

Web Title: NRHM shabargaadala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.