रेल्वे गाड्यांचे आरक्षण रद्द करण्याचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:13 AM2021-04-20T04:13:45+5:302021-04-20T04:13:45+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाची तिसरी लाट आली असून, देशभरात लॉकडाऊन होण्याचे चिन्हे आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनी आरक्षण ...
अमरावती : कोरोना संसर्गाची तिसरी लाट आली असून, देशभरात लॉकडाऊन होण्याचे चिन्हे आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनी आरक्षण तिकीट रद्द करण्यास वेग आला आहे. अमरावती रेल्वे स्थानकावरून गत तीन दिवसांपासून दरदिवशी १२५ ते १५० आरक्षण रद्द करण्यात येत आहे. जवळपास दीड लाख रुपये प्रवाशांना परतावा करावे लागत आहेत.
देशात रविवारपर्यंत १,४७,८८,१०९ कोरोनाग्रस्त, तर १,७७,१५० कोरोनाबळी ठरले. १,२८,०९,६४३ कोरोनामुक्त झाले आहे. कोरानाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, देशातील प्रमुख शहरांना कोरोनाने वेढले आहे. त्यामुळे याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर होत आहे. प्रवाशांनी उन्हाळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता, दोन महिन्यांपूर्वीच लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण करून ठेवले आहे. मात्र, कोरानाचा संसर्ग आणि मृत्युसंख्या लक्षात घेता, अनेकांनी रेल्वे गाड्यांचे आरक्षण रद्द करण्याचे सत्र चालविले आहे. त्याअनुषंगाने अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावरून आरक्षण रद्द करण्यास वेग आला आहे. अमरावती येथून बिहार, हरिद्धार, उत्तरप्रदेश, दिल्ली, चेन्नै, हैद्राबाद, हावडा या मार्गे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण तिकीट रद्द करण्यात येत आहे.
------------------------
विशेष रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी ओसरली
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे विशेष रेल्वे गाड्यांमध्ये एप्रिल महिन्यात अचानक गर्दी ओसरली आहे. मुंबई, पुणे मार्गावरील गाड्यांमध्येही आता आरक्षण सहजतेने मिळत आहे. पुणे, मुंबई येथे कडक लॉकडाऊनचा हा परिणाम मानला जात आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत कोरोनाचा परिणाम जाणवत आहे. रेल्वे प्रशासनाला आरक्षण तिकीट रद्द होत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे.
-----------
रेल्वे स्थानकावरून आरक्षण तिकीट रद्द करण्यासाठी दरदिवशी १२५ ते १५० प्रवासी येतात. त्याकरिता दीड लाखांची सरासरी रक्कम परत करावी लागत आहे. कोरोनामुळे ही स्थिती उद्भवली आहे.
- डी.व्ही. धकाते, आरक्षण केंद्रप्रमुख, अमरावती रेल्वे स्थानक