टँकरची संख्या घटली, पण पाणी समस्या नाही मिटली; ९ ठिकाणी टँकरने, तर ६४ गावांत विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By जितेंद्र दखने | Published: July 9, 2024 10:22 PM2024-07-09T22:22:50+5:302024-07-09T22:23:50+5:30

महिनाभरात १८ वरून टँकरची संख्या १२ पर्यंत घसरली आहे. असे असले तरी अद्यापही मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ९ गावांत टँकर सुरू आहेत, तर १४ पैकी १० तालुक्यांमधील ६४ गावांमधील वाड्या वस्तीवर ३४ बोअरवेल आणि ४४ विहीर अधिग्रहण अशा ७८ अधिग्रहणांद्वारे नागरिकांची तहान भागविली जात आहे.

Number of tankers reduced, but water problem not solved in amravati | टँकरची संख्या घटली, पण पाणी समस्या नाही मिटली; ९ ठिकाणी टँकरने, तर ६४ गावांत विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित फोटो

अमरावती : जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली; मात्र त्यानंतरही पावसाने म्हणावा तसा जोर पकडलाच नाही. एखादा दिवस जोरदार पाऊस कोसळला मात्र त्यानंतर पुन्हा मान्सूनची वाटचाल अद्यापही अडखळतच सुरू आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा अपेक्षित वाढत नसल्याने पाणीपुरवठा करणारे टँकर पूर्णतः बंद झालेले नाहीत.

महिनाभरात १८ वरून टँकरची संख्या १२ पर्यंत घसरली आहे. असे असले तरी अद्यापही मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ९ गावांत टँकर सुरू आहेत, तर १४ पैकी १० तालुक्यांमधील ६४ गावांमधील वाड्या वस्तीवर ३४ बोअरवेल आणि ४४ विहीर अधिग्रहण अशा ७८ अधिग्रहणांद्वारे नागरिकांची तहान भागविली जात आहे. त्यामध्ये चिखलदरा तालुक्यातच टँकर व बोअरवेल अधिग्रहण अधिक आहेत. यापाठोपाठ इतर नऊ तालुक्यांत केवळ विहीर व बोअरवेल अधिग्रहीत करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत मान्सूनने दमदार हजेरी लावली तर ही स्थिती झपाट्याने बदलूही शकते.

या गावांना टँकरने पाणीपुरवठा
मेळाघाटातील चिखलदरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या मोथा, खडीमल, धरमडोह, आकी, बहादरपूर, गोलखेडा बाजार, गवळीढाणा, स्कूलढाणा, कालापांढरी आदी अशा ९ गावांना १२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ आतापर्यंत १८ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. आता या संख्येत घट झाली आहे. केवळ सध्या चिखलदरा तालुक्यात ९ गावांत १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडल्यास हेही टँकर बंद होतील.
दीपेंद्र कोराटे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

Web Title: Number of tankers reduced, but water problem not solved in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.